*कोंकण एक्सप्रेस*
*शालेय जीवनातच कायद्याचे प्राथमिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणे ही काळाची गरज आहे – अॅड संग्राम देसाई*
*कणकवली : प्रतिनिधी*
विद्यार्थ्यांनी स्वतःची बुद्धिमत्ता,आवड व कौशल्य यांचा विचार करून स्वतःचे करिअर स्वतःच निवडा असा मौलिक सल्ला विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या वार्षिक पारितोषिक वितरण व परिमल हस्तलिखित प्रकाशन समारंभा प्रसंगी प्रमुख पाहुणे मान. अॅड. संग्राम देसाई,चेअरमन,बार कौन्सिल महाराष्ट्र गोवा यांनी व्यासपीठावरून बोलताना दिला.ते पुढे म्हणाले की मोबाईलचा उपयोग फक्त ज्ञान मिळवण्यासाठीच करा,त्याचा गैरवापर केल्यास आयुष्यभराचे नुकसान होऊ शकते.यासाठी शासनाने शालेय जीवनापासूनच कायद्याचे प्राथमिक ज्ञान विद्यार्थ्यांना दिले पाहिजे असे मत मांडले.
यावेळी व्यासपीठावर मान.श्री रुजारिओ पिंटो,कवी,उद्योजक व अध्यक्ष,सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन,शि.प्र.मं.कणकवली चे विश्वस्त अनिलपंत डेगवेकर,देणगीदार आनंद अंधारी, प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी.जे. कांबळे,पर्यवेक्षिका व्ही. व्ही.जाधव,सुरेश बिले,ज्येष्ठ शिक्षक अच्युतराव वनवे,सौ करंबेळकर मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग,सौ.राणे,मुख्याध्यापिका इंग्रजी विभाग, सांस्कृतिक विभाग प्रमुख जे.जे. शशेळके तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते परिमल हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.तसेच श्रीम. प्रतिभा खंडेराव कोतवाल,सहाय्यक शिक्षिका, जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ३,कणकवली
व श्रीम. विनिता विश्वास सामंत, मुख्याध्यापिका जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, बेळणे खुर्द यांना प्रशालेतर्फे शाल,श्रीफळ, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच विद्यामंदिरची आई म्हणून ओळखले जाणारे प्रशालेचे चतुर्थ कर्मचारी श्री अरुण रामकृष्ण इंगळे यांचा चतुर्थ कर्मचारी विशेष पुरस्काराने सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ.पी.जे कांबळे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत शाळेच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की शिक्षणाबरोबरच खेळ,चित्रकला,संगीत व विविध उपक्रमांद्वारे विद्यामंदिर प्रशाला कणकवलीने जिल्ह्यातील अग्रगणी शाळा म्हणून नावलौकिक मिळवला आहे.तसेच प्रशालेने सामाजिक क्षेत्रातही गरीब व होतकरू विद्यार्थी,वृद्धाश्रम,जि.प.शाळा तसेच वाडीवस्त्यात जाऊन विविध उपक्रम घेत सामाजिक व माणुसकीचे नातेही जपले आहेत.संस्थेचे वेळोवेळी मार्गदर्शन व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक सेवेमुळे विद्यामंदिर प्रशालेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे मान.रुजारिओ पिंटो यांनी त्यांच्या बहारदार मालवणी बोलीच्या कवितांनी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये हास्याचे तुफान आणत कार्यक्रमात रंजकता आणली.कवितांमधून त्यांनी कोकणचा निसर्ग, मालवणी भाषा आणि किल्ले यांचे जतन व संवर्धन झालं पाहिजे असा संदेश सर्वांना दिला. शि.प्र.मं. कणकवलीचे विश्वस्त अनिलपंत डेगवेकर यांनी शाळेबद्दल गौरोद्गार काढताना सांगितले की प्रशालेला यशाची कायम परंपरा लाभली आहे. या प्रशालेने प्रथितयश व्यापारी, राजकारणी, अधिकारी, डॉक्टर असे अनेक मान्यवर निर्माण केले आहेत. बक्षिसपात्र विद्यार्थ्यांनी ही परंपरा अशीच पुढे नेऊन शाळेचा उत्कर्ष करावा
असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.पर्यवेक्षिका व्ही.व्ही. जाधव यांनी अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे निवेदन आर.सी.सिंगनाथ त्यांनी केले, आभार प्रदर्शन अच्युतराव वनवे यांनी केले