*कोंकण एक्सप्रेस*
*मूल्याधारित समाज घडवण्यासाठी साने गुरुजींचे साहित्य हाच खरा पर्याय – वृंदा कांबळी*
*वेंगुर्ले येथे आयोजित साने गुरुजी शिक्षक साहित्य संमेलन संपन्न*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
गुरुजी शिक्षण आणि साहित्य ही त्रिसूत्री एकमेकात अतिशय चांगल्या प्रकारे गुंतलेली असून त्यातून महाराष्ट्राची संस्कृती उभी राहिली आहे. शिक्षणातून समाज घडला पाहिजे आणि साहित्यातून मानवतावादी समाजमन घडले पाहिजे.त्याग,सेवा आणि संवेदनशीलता ही मूल्ये रुजवण्यासाठी साने गुरुजींनी आपले उभे आयुष्य वेचले.त्यामुळे आज मूल्याधारित समाज घडवण्यासाठी साने गुरुजींचे साहित्य हाच खरा पर्याय आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका सौ.वृंदा कांबळी यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले.
वेंगुर्ले येथील परुळेकर दत्त मंदिरात बॅ.नाथ पै सेवांगण,मालवण व मुक्तांगण,वेंगुर्ले या संस्थांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवशीय साने गुरुजी शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी रमण किनळेकर, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर,अँड.देवदत्त परुळेकर,शिक्षक नेते संतोष परब आदी मान्यवर उपस्थित होते.
संमेलनामध्ये साने गुरुजी समजून घेताना या विषयावर भाष्य करताना अँड.देवदत्त परुळेकर म्हणाले,साने गुरुजी हा महाराष्ट्राला लाभलेला अमूल्य ठेवा असून आजच्या सामाजिक आणि धार्मिक विद्वेषाच्या काळात साने गुरुजींच्या विचारांवर अविचल निष्ठा ठेवून काम करण्याची नितांत आवश्यकता आहे.साने गुरुजींनी निर्माण केलेल्या राष्ट्र सेवा दलाची कार्यप्रणाली गतिमान करणे आणि त्यातून धर्मनिरपेक्ष समाजाची उभारणी करणे याची अपरीहार्यता आज निर्माण झाली आहे. आजचे शिक्षक, साहित्यिक यांनी साने गुरुजींच्या वाटेने चालण्याचे कष्ट घेतले पाहिजेत, असे सांगितले. यावेळी अन्य मान्यवरांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
साने गुरुजींच्या कथा या दुसऱ्या सत्रात भरत गावडे, श्यामल मांजरेकर, प्राजक्ता आपटे, देवयानी आजगावकर, महेश बोवलेकर यांनी परिणामकारक कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. वेगवेगळ्या साहित्यरसांचा परिपोष असलेल्या कथांची सार्थ निवड करून त्यानी साने गुरुजींच्या शब्दसामर्थ्याचा उपस्थितांना प्रत्यय दिला. या सत्राचे अध्यक्ष स्थान ज्येष्ठ लेखक अजित राऊळ यांनी भूषविले.
कवी संमेलनाचे तिसरे सत्र प्रथितयश कवी प्रा.मोहन कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.यावेळी मोहन कुंभार यांनी कवितेची निर्मिती प्रक्रिया आणि तिच्यातील जटिलता यावर भाष्य केले.साने गुरुजींची कविता आजही समाजमनाला हाक देत असून आजच्या कवींनी साने गुरुजींचा मानवतावादी धर्म जाणून घेतला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी योगेश सकपाळ,सरिता पवार,मनोहर परब,नीलम यादव,प्राजक्ता आपटे,किशोर कदम,श्यामल मांजरेकर, संजय घाडी,राजश्री घोरपडे,प्रज्ञा मातोंडकर,योगिता सातपुते,प्रतिभा चव्हाण,अजित राऊळ,कर्पूरगौर जाधव,एकनाथ जानकर यानी आपल्या कविता सादर करून सामाजिक स्थितीगतीच्या विविध स्तरांचे दर्शन घडवले.संमेलनास सीताराम नाईक,कालिदास खानोलकर,त्रिंबक आजगावकर,चित्रा प्रभूखानोलकर,प्रमिला राणे, रेश्मा पिंगुळकर,विशाखा वेंगुर्लेकर,कैवल्य पवार,गुरुदास मळीक, रामचंद्र मळगावकर,पी.के.कुबल,वीरधवल परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एकनाथ जानकर यांनी तर आभार कैवल्य पवार यांनी व्यक्त केले.