*कोकण Express*
*कृषी विज्ञान केंद्र व किर्लोस्कर उद्योग समूहाच्यावतीने कृषी उपक्रम राबविणार ; संजय किर्लोस्कर*
*कृषी विज्ञान केंद्र किर्लोसच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमांनचा दिमाखदार शुभारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा केला सत्कार….*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जेव्हा किर्लोस्कर कंपनी स्थापन झाली तेव्हा, कडबा कुट्टी हे यंत्र सुरू केले. आज देशात आणि परदेशात कंपनी पंप आणि अत्याधुनिक कृषी यंत्रांची निर्मिती करत आहे. हे यश किर्लोस गावातील जनतेच्या आणि देवतेच्या आशीर्वादामुळे मिळाले अशी आमची भावना आहे. किर्लोस गावाच्या विकासासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील जनतेला फायदा व्हावा यासाठी कृषी विज्ञान केंद्र किर्लोस आणि किर्लोस्कर उद्योग समूहाच्या वतीने किर्लोस येथे कृषी विषयक विविध उपक्रम राबविले जातील. ज्यातून येथील शेतकऱ्यांना फायदा होईल. असे प्रतिपादन किर्लोस्कर उद्योग समूहाचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र किर्लोसच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित पुरस्कार व सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी किर्लोस येथील विज्ञान केंद्राच्या रौप्य महोत्सवाचे किर्लोसकर उद्योग समूहाचे अध्यक्ष संजय किर्लोसकर व त्यांचा मुलगा आलोक किर्लोसकर, मॅप्रोचे संचालक निकुंज वोरा, आम.वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत रौप्य महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला.
यावेळी अँड. उमेश सावंत, डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष प्रदीप सावंत, सचिव दिनानाथ वेरनेकर, संचालक सुशांत नाईक, बाबू रावराणे, प्राचार्य आशिष पाटील, आनंद सावंत, बाळा लाड, किशोर लाड, प्रशांत सावंत, बाळू मेस्त्री उपस्थित होते. तसेच फ्रेंड ऑफ फार्मर्स चे नीलम दळवी, प्लेचर पटेल, उन्मेष बागवे, अमर आपटे आदी उपस्थित होते.
तदपूर्वी कृषी फेरी काढण्यात आली. तर कुंभारकला, भजन कला, पाककला अशा कोकणी संस्कृतीचे दर्शन मान्यवरांना घडविण्यात आले. विज्ञान युगाला गवसणी घालणाऱ्या स्टॉलची पाहणीकरत कोकणातील परंपरा तसेच शेती पिकाची माहिती घेतली. तसेच किर्लोस्कर उद्योग समूहाचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांनी गावातील देवदेवतांचे दर्शन घेतले तेव्हा ते म्हणाले,आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या मूळ गावी आल्याने समाधान होते. यापुढे सातत्याने गावी येत जाऊ, गावाने केलेल्या सत्कारने ते भारावून गेले.
कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून चालले पाहिजे. जमिनीची सेवा करण्यास विसरू नकोस असे मला वडिलांनी सांगितले होते. मी भारतीय सेनेत सेवा केली आणि आजही कृषी केंद्राच्या माध्यमातून जमिनीची सेवा करत आहे. गाव समृद्ध झाल्या शिवाय देश समृद्ध होणार नाही.त्यामुळेच समृद्ध गाव ही संकल्पना आपण अमलात आणत आहोत असे ते म्हणाले.
यावेळी अँड. उमेश सावंत,डॉ.विद्याधर तायशेटे, पोखरनेचे शेतकरी एस.के.सावंत, डॉ.सदडेकर, माजी भारतीय सैनिक प्रवीण पाटील,योगेश सावंत, शाम सावंत, जेष्ठ नागरिक रत्नोबा घाडीगांवकर, प्रदीप सावंत, बाळा लाड, संतोष काकडे आदींचा सत्कार करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख भास्कर काजरेकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहा सामंत व मयूर सावंत यांनी केले. आभार प्रदीप सावंत यांनी मांडले.