तरुणांनी आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्र आत्मसात करावे- निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे

तरुणांनी आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्र आत्मसात करावे- निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे

*कोंकण एक्सप्रेस*

*तरुणांनी आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्र आत्मसात करावे- निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे*

*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*

राज्यात कोठेही आपत्ती आली तर त्या ठिकाणी NDRF पथकाचे जवान त्वरित पोहोचतात.मात्र एवढ्या मोठ्या राज्यात प्रत्येक ठिकाणी NDRF जवानांना जाणे शक्य होत नाही अशा वेळी स्थानिक तरुणांनी आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्र आत्मसात करून स्थानिक आपत्ती मध्ये NDRF पथकाप्रमाणे कामगिरी पार पाडली पाहिजे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तरुण हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेवून NDRF जवान बनला पाहिजे.जेणेकरून आपत्ती आल्यास स्थानिक तरुणांच्या मदतीने आपत्ती मध्ये काम करता येईल.त्या अनुषंगाने सर्वांनी सक्रीयपणे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात सहभाग घ्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले.

छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस-ओरोस येथे दि.१२ डिसेंबर रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रशिक्षणात श्री सुकटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपिठावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीम.राजश्री सामंत, कुडाळ नायब तहसीलदार संजय गवस, NDRF पथक प्रमुख पंकज चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या श्रीम.सोनल परब व NDRF पथकाचे जवान उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला महाविद्यालाचे २०० विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग मार्फत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF) पुणे यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दि.०१ डिसेंबर २०२४ ते दि.१५ डिसेंबर २०२४ या कालावधीत विविध ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणे आयोजित करण्यात आलेली आहेत.

विद्यार्थी दशेत अनेक विद्यार्थी पर्यटन सफरीच्या अनुषंगाने समुद्र, नद्या, डोंगर यांना भेटी देत असतात. अशा वेळी पाण्यात बुडणे, दरीत कोसळणे, रस्ते अपघात, विषबाधा अशा प्रकारच्या आपत्ती उद्भवल्यास त्यावेळी कोणते प्रथमोपचार द्यावेत, पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला बाहेर कसे काढावे, त्याला CPR कसा द्यावा, रस्ते अपघातील जखमी व्यक्तींना कसे हाताळावे, उपलब्ध साहित्याच्या अनुषंगाने स्ट्रेचर कसे बनवावे याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. विषारी व बिनविषारी सापांच्या विविध प्रजातींची माहिती NDRF पथकामार्फत देण्यात आली. तसेच विषारी व बिनविषारी साप कसा ओळखावा या अनुषंगाने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.

कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या वेळी आपत्तीची पूर्व सूचना देणारे सचेत अॅप, वीज पडण्याची पूर्व सूचना देणारे दामिनी अॅप, भारतीय हवामान विभागाची मौसम वेबसाईट याबाबत माहिती देण्यात आली. सदर बाबींचा वापर करून तरुणांनी आपत्ती विषयक पूर्व सूचना मिळवावी व पुढे उद्भवणाऱ्या आपत्तींबाबत स्वतः जागरूक राहून आजूबाजूच्या समाजाला देखील त्या दृष्टीने सावध करावे असे आवाहन सदर प्रशिक्षणाच्या अनुषंगाने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!