*कोंकण एक्सप्रेस*
*’व्हेंटिलेटरवर’असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचा आमदार निलेश राणे यांनी घेतला आढावा*
*मालवण : प्रतिनिधी*
रिक्त पदे,इमारतीची दुरावस्था,निधीची कमतरता अशा समस्यांच्या गर्तेत सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय गेली दहा वर्षे खडतर प्रवास करत आहे. ‘व्हेंटिलेटरवर’ असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था व आरोग्य सेवेचा सविस्तर आढावा आमदार निलेश राणे यांनी वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांच्याकडून घेतला.
दरम्यान,सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयच्या माध्यमातून जिल्हा वासियांना तत्पर आरोग्य सेवा मिळावी यासाठी मोठा बॅकलॉग भरून काढायचा आहे. जिल्हा रुग्णालयाला उर्जीतावस्था मिळवून द्यायची आहे. यासाठी आपण शासन स्तरावर गतिमानरित्या प्रयत्नाशील राहणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.गोरगरीब सर्वसामान्य जनतेला तात्काळ आणि तत्पर आरोग्य सेवा सुविधा जिल्हा रुग्णालय व सलग्न विभाग यां माध्यमातून मिळावी. यासाठी सर्वप्रथम आरोग्य सेवेचा आढावा घेत त्या दृष्टीने आमदार निलेश राणे यांनी दिलेले लक्ष निश्चितच जिल्हावासियांसाठी दिलासादायक आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डीन डॉ.मनोज जोशी,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक शाम पाटील यांसह अन्य वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून माहिती जाणून घेत जिल्हा रुग्णालय,महिला रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील आरोग्य सेवा सुविधा यांचा आढावा घेण्यात आला.
मागील दहा वर्षाचा कार्यकाळ कुडाळ मालवणला विकासात जसा मागे नेणारा होता तीच स्थिती आरोग्य सेवेत दिसून आली.आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटर गेली.याचा फटका गोरगरीब जनतेला सहन करावा लागला आणि लागत आहे.सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय तसेच संलग्न आरोग्य विभाग,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी रिक्त पदांची संख्या मोठी आहे.130 डॉक्टर संख्या अपेक्षित असताना 30 डॉक्टर कार्यरत आहेत.400 नर्स पैकी केवळ 34 नर्स आहेत. क्लरीकल स्टाफ 108 पैकी 6 आहे.जिल्हा रुग्णालय निगडित मालवण ग्रामीण रुग्णालय स्थिती पाहता वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत.वैद्यकीय अधीक्षक पदही प्रभारी.अनेक ठिकाणी ही स्थिती आहे.यासह जिल्हा रुग्णालय येथे एमआरआय सुविधा नाही. ऑर्थो सुविधा नाही,अन्य सुविधाचीही कमतरता आहे.जो औषधं साठा उपलब्ध करावा लागतो त्यासाठी निधी तरतूद असते ती पुरेशी नाही.मागील 3 कोटींची बिल थकीत आहेत.आरोग्य विभाग खरोखरच व्हेंटिलेटर असल्याची स्थिती दहा वर्षात झाली आहे.
जिल्हा रुग्णालय इमारतीची अवस्थाही चांगली नाही.निधी अभावी दुरुस्ती रखडली.एकूणच कुठल्याही गोष्टीकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे ही भयावाह स्थिती निर्माण झाली.कुडाळ मालवण मतदारसंघात मध्यवर्ती जिल्हा रुग्णालय येत असताना दहा वर्षात याठिकाणची अवस्था भीषण आहे.याचा परिणाम रुग्ण सेवेवर मोठया प्रमाणात झाला आहे.
जिल्हा रुग्णालय व संलग्न विभाग येथील आरोग्य सेवा सुविधा यांचा बॅकलॉग भरून काढण्याचा आपला प्रयत्न राहील.सातत्याने आरोग्य अधिकारी यांच्या संपर्कात राहून शासन स्तरावर पाठपुरावा सुरु राहील. जे जे लवकरात शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न आहे. अधिवेशन काळतही आरोग्य प्रश्न मांडून अधिक आरोग्य सुविधा साठी निधी तरतूद व अन्य मंजुरीसाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार निलेश राणे यांनी यां निमित्ताने स्पष्ट केले.