*कोंकण Express*
*आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव 22 फेब्रुवारीला*
*12 ते 14 डिसेंबर देवालय धार्मिक विधीसाठी बंद राहणार*
*मालवण : प्रतिनिधी*
प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा 22 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे.गुरुवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली.
आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते.देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो.यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात.वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी याची देही याची डोळा पाहुन जिवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो.
याच लाखो भाविकाना केंद्रबिंदु मानुन भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली आहे.अनेक व्यापारी, व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात. आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खाजगी वाहनांच्या बुकिंग साठी चढाओढ लागली आहे.