*कोंकण Express*
*राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या एसटीच्या बसेस मंत्रालयापर्यंत न्याव्यात – मोहन केळुसकर*
*कणकवली : प्रतिनिधी*
राज्य परिवहन महामंडळाने गतवर्षी प्रवाशांना अधिक आकर्षक सवलती जाहीर केल्यात.त्यामुळे प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या गाड्यांमध्ये प्रामुख्याने मंत्रालयात आपली गार्हांणी मांडण्यासाठी येणाऱ्या प्रवासी नागरिकांच्या संख्येतही लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे.त्यामुळे अशा नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागू नये, म्हणून राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या एसटीच्या गाड्या मंत्रालयापर्यंत न्याव्हात, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
श्री केळुसकर हे एकेकाळी एसटी, तसेच रेल्वे प्रवासी संघटनांमध्ये कार्यरत होते. त्यामुळे राज्यभरातील अनेक जिल्हांतील सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केळुसकर यांच्याशी संपर्क साधून उपरोक्त मागणीसाठी आपण प्रयत्न करावेत,असा लकडा लावला आहे.
या संदर्भात अधिक स्पष्टीकरण करताना केळुसकर यांनी राज्यभरातून शेकडो एसटीच्या गाड्या मुंबईत येतात. पण या गाड्या एसटीच्या मुंबईतील विविध स्थानकांपर्यंत प्रवाशांना सोडतात. परिणामी खेड्यापाड्यांतून आपली गाऱ्हाणी मंत्रालयात मांडण्यासाठी आलेल्या गरीब खेडूत नागरिकांची परवड सुरू होते, असे सांगून ते म्हणाले,अशा नागरिकांना मंत्रालयात जाण्यासाठी टॅक्सी,ओला आदींसाठी भरमसाठ भाडे द्यावे लागते.त्यांची आर्थिक कुचंबणा होते.त्याचबरोबर मुंबई सेंट्रल स्थानकाच्या पुढचे गिरगाव, कुलाबा आदी उपनगरांतील रहिवासी असलेल्यांनाही अशा भाड्यापोटी एसटीच्या तिकिटांपेक्षा अधिक भाडे मोजून प्रवास करावा लागतो.
कर्नाटक, गुजरात, गोवा आदी विविध राज्यांतील राज्य परिवहन महामंडळांनी अशा प्रवाशा़ंसाठी मंत्रालयापर्यंत थेट सेवा सुरू केली आहे, असे दाखले देऊन केळुसकर म्हणतात,आम्ही मंत्रालय परिसरात फेरफटका मारला असता असंख्य पिचलेले नागरिक आपल्या दिर्घकालिन समस्या घेऊन मंत्रालयाच्या पायऱ्या चढतात. पण तोपर्यंत ते नागवले गेलेले असतात.परतताना त्यांच्या खिशात परतीच्या प्रवासासाठी पैसे शिल्लक असतीलच, असे नसते. त्यामुळे राज्य सरकारने परिवहन महामंडळाच्या सहकार्याने अशा प्रकारे मंत्रालयापर्यंत सर्वं थेट एसटी गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिल्यास आम मायजनता राज्य सरकारला शुभेच्छा देईल.