*कोंकण Express*
*कुडाळ येथे जानेवारीपासून ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्ग सुरू*
*कुडाळ : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ आणि कोकण विभाग ग्रंथालय संघ यांच्या सहकार्याने येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालयातर्फे (जिल्हा ग्रंथालय) १ जानेवारीपासून ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्ग सुरू करण्यात येणार आहे. या वर्गाचा कालावधी जूनपर्यंत म्हणजे सहा महिन्यांचा असून दर शनिवार व रविवार असे आठवड्यातून दोन दिवस हा वर्ग कुडाळ येथे चालविण्यात येणार आहे.प्रत्यक्ष ग्रंथालयीन कामकाजाच्या प्रात्यक्षिकांचा त्यात समावेश असणार आहे.
ग्रंथालयात पुस्तकांची मांडणी, नोंदणी, वर्गीकरण, तालिकीकरण, व्यवस्थापन अशा शास्त्रीय पद्धतीचा वापर करण्यात येतो. त्यासाठी प्रशिक्षित सेवकांची आवश्यकता असते. असे प्रशिक्षण देणारी प्रणाली म्हणजे शासनमान्य ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्ग होय. तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे वर्गात प्रवेश घेण्यासाठी वयाची अट नाही. मात्र, बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. प्रवेश प्रक्रिया १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. वर्गाची क्षमता ५० एवढी आहे. ग्रंथालयात काम करणाऱ्या सेवकांना प्राधान्य राहील. अधिक माहितीसाठी वाचनालयाचे ग्रंथपाल तथा वर्ग व्यवस्थापक राजन पांचाळ, (९४२३०२६७३५) येथे सकाळी नऊ ते दुपारी बारा व दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन कार्यवाह डॉ विवेक पाटणकर यांनी केले आहे.

