*कोंकण Express*
*हळबे महाविद्यालयात बाबासाहेबांना आदरांजली*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. रामदास रेडकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेतला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सुभाष सावंत म्हणाले की देशाच्या उभारणीमध्ये बाबासाहेबांचे योगदान मोठे आहे. देशात अनेक जाती, धर्म, पंथ, असल्याने त्या सर्वांना सामावून घेणारी सर्व समावेशक घटना लिहिणे सोपे काम नव्हते. पण बाबासाहेबांनी ते करून दाखवले. महिलांना समान संधी, न्याय, हक्क व मताचा अधिकार दिला. ग्रामीण, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजुर व सर्वसामान्य व्यक्तींच्या मताचा आदर केला.
भारताच्या विकासासाठी नदीजोड प्रकल्पाचे महत्त्व सांगितले. आर्थिक, सामाजिक, राजकीय, क्षेत्रात न्यायाची भूमिका घेऊन काम केले. छत्रपती शिवाजी महाराज, व शाहू, फुले यांच्या विचाराचा वारसा त्यांनी पुढे चालविला. म्हणून आपला देश आज त्यांच्याच मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून मार्गक्रमण करताना आढळून येतो. यावेळी रामदास रेडकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन प्रा. डॉ पी डी. गाथाडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ संजय खडपकर यांनी मानले.