*कोंकण Express*
*चिवला बीच येथे आयोजित पोहण्याच्या स्पर्धेत स्थानिकांना शुल्कात सूट द्या – शिल्पा खोत यांची मागणी*
*मालवण : प्रतिनिधी*
चिवला बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या पोहण्याच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्थानिक स्पर्धकांना शुल्कामध्ये सूट मिळावी अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे व तहसीलदार वर्षा झालटे यांना दिले आहे.
शहरातील चिवला बीच येथे २१ व २२ डिसेंबरला पोहण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चिवला बीच येथील समुद्रकिनाऱ्यावर मुंबईची एक संस्था दरवर्षी पोहण्याच्या स्पर्धा आयोजित करते. या स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाला २ हजार रुपये शुल्क द्यावे लागते. ही स्पर्धा आयोजित करणे योग्यच आहे. मात्र स्थानिक स्पर्धकांना शुल्कामध्ये कोणत्याही प्रकारे सूट दिली जात नाही. स्थानिक मुलांचे पालक शहरवासियांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या संपन्न नसल्यामुळे, केवळ आर्थिक कारणास्तव स्थानिक मुलांना या स्पर्धांमध्ये सहभागी होणे शक्य होत नाही. त्यामुळे नगरपरिषदेमार्फत स्थानिक भूमिपुत्रांना १०० तकके शुल्कामध्ये सूट देण्याची अट संबंधित संस्थेला परवानगी देतानाच घालण्यात यावी. तसेच गावातील भूमिपुत्रांसाठी हे कायम स्वरूपी धोरण ठेवावे व त्यांना शुल्कात पूर्णतः माफी द्यावी. या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख प्रवेश अर्जामध्येच केलेला असावा. आमची ही विनंती मान्य करून स्थानिक मुलांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी असे निवेदनात सौ. खोत यांनी म्हटले आहे.
यावेळी माजी नगरसेवक यतीन खोत, मंदार केणी, महेश जावकर, तपस्वी मयेकर, संमेश परब, अमान गोडबोले, शांती तोंडवळकर, मानसी घाडीगावकर, अश्विनी आचाटेकर, तन्वी भगत, नंदा सारंग, निखील शिंदे, नरेश हुले आदी उपस्थित होते.