*कोंकण Express*
*सिंधुदुर्गनगरीत १० डिसेंबरला बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन*
*सिंधुदुर्गनगरी: प्रतिनिधी*
बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत.या विरोधात जागतिक मानव हक्क दिन १० डिसेंबरला सिंधुदुर्गनगरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संतोष प्रभू यांनी आज दिले आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संतोष प्रभू, चिन्मय रानडे आदी उपस्थित होते. या निवेदनात, बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवर देखील ते अमानविय पद्धतीने अत्याचार करत आहेत. आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने याची दखल घ्यावी व तेथील मुंडा, चकमा, उकी, बौद्ध इत्यादी आदिवासी व दलित हिंदू बांधवांना इस्लामी कट्टरतावाद्यांनी वैद मार्गाने जीवन जगणे अत्यंत कष्टप्रद करून टाकले आहे. यास्तव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्यावतीने बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचारामुळे मानवाअधिकाराचे हनन होत असल्याने व्यतीथ झालेले सर्व हिंदू बांधवांतर्फे प्रकट निषेध करण्यासाठी व त्यांचे मूलभूत मानवाधिकाराचे संरक्षण व्हावे व संवर्धन व्हावे यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा १० डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. हा मूक मोर्चा असून हा मोर्चा म्हणजे बांगलादेश हिंदू न्याय यात्रा असणार आहे. या यात्रेमध्ये जिल्ह्यातील सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.