*कोंकण Express*
*मानव मुक्तीसाठी डॉ बाबासाहेबांनी लढा उभारला -डॉ.सतीश कामत*
*फोंडाघाट : प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये सांस्कृतिक विभागाच्यावतीने महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सतीश कामत उपस्थित होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
त्याप्रसंगी बोलताना डॉ. सतीश कामत म्हणाले की, बाबासाहेबांना कमी आयुष्य मिळून सुद्धा पर्वता एवढे मोठे सामाजिक काम त्यांनी केले. त्याचबरोबर समाज सुधारण्याचेही काम केले. परंतु सध्याच्या काळात ते काम मागे पडल्याचे लक्षात येते, त्यामुळे त्यांचे काम पुढे नेण्याचा आपण आज प्रण केला पाहिजे. डॉ. बाबासाहेबांचे काम हे मानव मुक्तीचे व मानवी समतेचे परिवर्तनाचे होते. एकंदरीतच मानवाच्या जगण्याचे प्रश्न त्यांनी मांडले. त्यासाठी ते लढले आणि जिंकले सुद्धा. असे प्रतिपादन त्यांनी केले.
आपल्या मनोगतात विभाग प्रमुख प्रा. विनोदसिंह पाटील म्हणाले की, आजच्या काळाला डॉ आंबेडकर यांची विचारधारा समजून घेण्याची गरज आहे. जनमानसात वाढलेले तेढ कमी करायचे असतील तर डॉ. आंबेडकरचे विचार कामी येतात. हे विचार करण्याची ताकद येण्यासाठी आपण शिकले पाहिजे, संघटित झाले पाहिजे आणि नंतर संघर्ष केला पाहिजे. शिकून आणि संघटित राहून केलेला संघर्ष कधीच पराभूत होत नसतो. त्यामुळे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे तत्व आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.