*कोंकण Express*
*महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा*
*मुंबई : प्रतिनिधी*
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर महायुतीमधून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी (CM) कुणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली होती. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे.
त्यामुळे फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री होणार असून उद्या ते आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.
यावेळी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार आणि भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या तीनही नेत्यांनी यावेळी राज्यपालांना आपल्याला असणाऱ्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले. त्यानंतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी महायुती सरकारला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले. त्यानुसार उद्या सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्या (दि.०५ डिसेंबर) रोजी आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह किती मंत्र्यांचा शपथविधी होईल याची माहिती संध्याकाळी दिली जाईल. तसेच काल एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मी त्यांना आपण सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, अशी विंनती केली आहे. त्यामुळे ते आमच्या विनंतीचा मान ठेऊन सरकारमध्ये सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.
यानंतर राजभवनात तिन्ही नेतेमंडळींची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात धमाल संवाद रंगला. एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. या अनुषंगाने शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असणार की नाही. तेव्हा शिंदे म्हणाले की, संध्याकाळपर्यंत धीर धरा. मी किंवा अजितदादा उद्या शपथ घेणार आहोत की नाही,याबाबत लवकरच कळेल.शिंदे यांचे हे वाक्य संपताच अजित दादा म्हणाले की,त्यांचे माहिती नाही पण मी उद्या नक्कीच शपथ घेणार आहे,मी थांबणार नाही.
अजितदादा असं म्हणाल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की,दादांना शपथ घेण्याचा अनुभव आहे.त्यामुळे ते लगेच तयार आहेत.त्यांना संध्याकाळी शपथ घेण्याचाही अनुभव आहे आणि सकाळीही शपथ घेण्याचा अनुभव आहे.यावर अजितदादा म्हणाले की,आम्ही मागच्यावेळी शपथ घेतली होती. पण यावेळी जी शपथ घेऊ ती पाच वर्षांसाठी असेल.