*कोंकण Express*
*भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला भक्तीमय वातावरणात प्रारंभ*
*कणकवली : प्रतिनिधी*
योगियांचे योगी,असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवास बुधवारी भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.यानिमित्त पुढील चार दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
आज बुधवारी पहाटे भालचंद्र महाराज यांच्या समाधी स्थळाचे विधिवत पूजन करण्यात आले.पहाटेच्यावेळी भक्तांनी काकड आरती करत वातावरण भक्तिमय केले. सकाळी पुरोहितांच्या मंत्रोपच्चारात सर्व भक्तांच्या कल्याणार्थ भालचंद्र महारुद्र, महाभिषेक अनुष्ठान केला.या विधीला अमेय धडाम दांपत्याच्या हस्ते महाभिषेक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी भालचंद्र संस्थांचे अध्यक्ष व कमिटीचे पदाधिकारी व भाविक भक्त उपस्थित होते.
दुपारी भालचंद्र महाराज यांची महाआरती करण्यात आली. आरतीला देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुपारच्या सत्रात भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भजनी कलाकारांनी भजने सादर करून वातावरण भक्तिमय केले. सायंकाळच्या सत्रात ह.प.भ. श्री लक्ष्मीप्रसाद शंकरराव पटवारी, रा. बीड शिवसमर्थ योग या विषयावर कीर्तन पार पडले यावेळी रसिक श्रोते उपस्थित होते.
भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त संस्थात परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भालचंद्र महाराज यांची मूर्ती व समाधी स्थळ विविध फुलांच्या सहाय्याने सजविण्यात आले आहे. भालचंद्र महाराजांचे हे मनमोहक दृष सर्वांचे लक्षवेधून घेत होते. भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवामुळे शहरात भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भालचंद्र महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी संस्थान परिसरात गर्दी दिसून आली.