*कोंकण Express*
*कोळोशी खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धिविनायक पेडणेकर याला न्यायालयीन कोठडी*
*कणकवली : प्रतिनिधी*
मुंबई पोलिस दलात सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावरुन स्वेच्छानिवृत्ती घेतलेले विनोद मधुकर आचरेकर (55) यांचा डोक्यात कुदळ मारून खून करण्यात आला होता.याप्रकरणी संशयित आरोपी सिद्धिविनायक ऊर्फ पप्पू संजय पेडणेकर (24, रा. कोळोशी, वरचीवाडी) याची पोलिस कोठडी संपल्याने मंगळवारी त्याला कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले.त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
दरम्यान, विनोद आचरेकर यांचा खून हा संशयित आरोपी सिद्धिविनायक पेडणेकर याने अनैसर्गिक संबंधामुळे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.तर या प्रकरण अंतर्गत कणकवली पोलिसांनी सिद्धिविनायक पेडणेकर याच्या संपर्कात असलेल्या काही व्यक्तींची त्यांच्याबरोबर मोबाइल व्हॉट्सअपवर झालेल्या संभाषणाच्या पार्श्वभूमीवर चौकशी सुरु केली आहे.काही तरुणांना मंगळवारी पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली.पेडणेकर याच्यासोबत असलेल्या संभाषणाबाबत काहींचे जाब जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत.
विनोद आचरेकर यांच्या घराच्या परिसरात साफसफाईचे काम केलेल्या कामगारांना देखील पोलिसांनी पोलिस ठाण्यात बोलावले होते.या खून प्रकरणाचा पोलिस सर्वांगाने तपास करीत आहेत.या खून प्रकरणी आवश्यकता भासल्यास पुन्हा न्यायालयीन कोठडीतून चौकशीसाठी सिद्धिविनायक पेडणेकरला पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता आहे.त्याला न्यायालयीन कोठडी झाल्यामुळे त्याची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात आली आहे.