*कोंकण Express*
*बांदा- निमजगा शाळेतील मुले अद्यापही गणवेशाच्या प्रतिक्षेत !*
*ठाकरे शिवसेनेचा आक्रमक पवित्रा*
*रियाज खान यांचा बीडीओंना आंदोलनाचा इशारा*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
शाळा सुरू होवून सहा महिने उलटले तरी बांदा-निमजगा शाळा नं.२ च्या मुलांना अद्याप पर्यंत गणवेश प्राप्त झालेले नाहीत. याबाबत ठाकरे शिवसेनेचे युवा सेना प्रमुख रियाज खान यांनी नाराजी व्यक्त केली असून संबंधित मुलांना तात्काळ गणवेश उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, सावंतवाडी तालुक्यातील बांदा-निमजगा येथे असलेल्या या शाळेत सहा महिने झाले तरी अद्याप पर्यंत मुलांना गणवेश मिळालेला नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करुन सुध्दा त्या ठिकाणी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे याबाबत तात्काळ योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हाला पालकांना घेवून वेगळा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन श्री. नाईक यांच्याकडुन देण्यात आले आहे. यावेळी विजय बांदेकर, रंगनाथ मोठे, सचिन राठोड, शैलेश टिळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.