पुण्यातील सीरम इन्स्टि्यूटला वैद्यकीय चाचणीसाठी भरती थांबवण्याचा आदेश भारतीय औषध नियंत्रक विभागाकडून (DCGI) देण्यात आला आहे. करोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी पुढील आदेश येईपर्यंत नव्या स्वयंसेवकांना घेतलं जाऊ नये असं डीसीजीआयने आदेशात सांगितलं आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. दुष्परिणामांच्या संशयामुळे ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी जगभरात थांबवण्यात आली आहे. अॅस्ट्राझेन्का कंपनीने बुधवारी यासंबंधी अधिकृत घोषणा केली. भारतात ‘कोव्हीशिल्ड’ नावाने सीरम इन्स्टिटय़ूटकडून लस उत्पादित केली जात होती. यासाठी त्यांनी चाचण्याही सुरु केल्या होत्या.
डीसीजीआयने सीसीरम इन्स्टि्यूटला चाचणीदरम्यान लस देण्यात आलेल्यांच्या सुरक्षेची सर्व उपाययोजना करण्याचं तसंत सातत्याने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासही सांगितलं आहे. लस देण्यात आलेल्या युकेमधील व्यक्तीमध्ये दुष्परिणाम जाणवू लागल्यानंतर ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी थांबवण्यात आली आहे. सीसीरम इन्स्टि्यूटचे प्रमुख आदर पूनावाला यांनी गुरुवारी यासंबंधी बोलताना भारतात पुढच्या आठवड्यापासून सुरुवात होणारी तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवत असल्याची माहिती दिली होती.