*कोंकण Express*
*एसटी आगारात साजरा होणार ६ डिसेंबर पासून प्रवासी राजा दिन*
*प्रवाशांना लाभ घेण्याचे विभाग नियंत्रक प्रल्हाद घुलेंचे आवाहन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने १५ जुलैपासून प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ व ‘कामगार पालक दिन’ आयोजित करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग विभागातील आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्याकरिता डिसेंबर महिन्यातील नियोजन पुढीलप्रमाणे आहे. वेंगुर्ला ६ डिसेंबर, मालवण ९ डिसेंबर, सावंतवाडी १३ डिसेंबर कणकवली १६डिसेंबर, देवगड २९ डिसेंबर, विजयदुर्ग २३ डिसेंबर, कुडाळ २७ डिसेंबर, परत वेंगुर्ला ३० डिसेंबर या वेळापत्रकानुसार राज्यपरिवहन आगारात सकाळी १० ते २ या वेळेत प्रवासी राजा दिन’ साजरा करण्यात येणार असून या वेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा महाविद्यालये आपल्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतात व ‘प्रवासी राजा दिन’ झाल्यानंतर दुपारी ३ ते ५ या वेळेत ‘कामगार पालक दिन’ साजरा करण्यात येणार असून या वेळेत संघटना व राज्यपरिवहन कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बाबतीतील प्रश्न (रजा मंजुरी, कर्तव्यासंबंधी, वेळापत्रकासंबंधी व प्रमादीय कारवाई) तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे निराकरण करतील. प्रवासी बंधू-भगिनींनी व राज्य परिवहन कामगार यांनी याचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करुन घ्यावे, असे आवाहन विभाग नियंत्रक प्रल्हाद घुले यांनी केले आहे.
*गुणवत्तावाढीस मदत*
या उपक्रमाअंतर्गत विभाग नियंत्रक एसटी आगारात जाऊन प्रवाशांच्या व राज्यपरिवहन कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील, त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होईल, असे मत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केले आहे.