*कोंकण Express*
*राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १ डिसेंबरला*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ रविवार १ डिसेंबर २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ आणि कुडाळ हायस्कूल, कुडाळ ज्युनियर कॉलेज या दोन उपकेंद्रावर घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांनी दिली आहे. ही परीक्षा सकाळी १० ते दुपारी १२ व ३ ते सायंकाळी ५ या दोन सत्रात घेण्यात येणार आहे. एकूण ५८३ उमेदवार या परीक्षेसाठी बसणार आहेत. आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ (KD००१००१ ते KD ००११९२), कुडाळ हायस्कूल, कुडाळ ज्युनियर कॉलेज (KD ००२००१ ते KD००२३९१) अशी परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्वाच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये उमेदवारांनी परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर उपस्थित राहावे.येताना सुधारित प्रवेश प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट,निवडणूक आयोग ओळखपत्र, स्मार्ट कार्ड व ड्रायव्हींग लायन्सन यापैकी एक व त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्यावेळी स्वतंत्र सादर करावी.
आयोगामार्फत आयोजित परीक्षामध्ये कॉपीचा, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात येणार असून आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षांकरिता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी (Frisking) करण्यात येणार आहे. पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकारी स्वतः पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.