*कोंकण Express*
*मळेवाड गावात जिल्हा बँकेच्या एटीएमची मागणी – हेमंत मराठे*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
मळेवाड गावात जिल्हा बँकेचे एटीएम द्यावे अशी मागणी उपसरपंच हेमंत मराठे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्याकडे केली आहे. सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावात जिल्हा बँकेची शाखा आहे. सावंतवाडी मळेवाड – शिरोडा या मार्गावरून दिवसा मोठ्या प्रमाणात पर्यटकांची येजा असते. तसेच मळेवाड चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. मात्र या ठिकाणी कोणत्याही बँकेचे एटीएम नसल्याने एखाद्याला तात्काळ पैशांची गरज असली तर त्याला एटीएम नसल्याने पैसे मिळणे शक्य होत नाही.
यामुळे मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखा मळेवाड या ठिकाणी जिल्हा बँकेचे एटीएम मिळावे यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संचालक महेश सारंग यांच्याकडे एटीएमसाठी मागणी केली असून या दोघांनी एटीएम देण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. लवकरच एटीएमच्या मागणीची पूर्तता करण्याचेही आश्वासन अध्यक्ष मनीष दळवी व संचालक महेश सारंग यांनी दिले आहे.