*कोंकण Express*
*भाजप घेईल तो निर्णय मान्य – एकनाथ शिंदे*
*उद्याच्या बैठकीनंतर सत्ता स्थापनेचा दावा करणार*
*मुंबई : प्रतिनिधी*
भाजपचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. आमची कोणतीही ना नाही, आम्ही कोणता विषय ताणून ठेवलेला नाही. आम्ही शिवसेना म्हणून त्यांच्या कायम पाठीशी आहोत, अशी भूमिका राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. त्यामुळे राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बसणार हे आता अंतिम झाले आहे. दरम्यान याबाबत उद्या दिल्लीला महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक वरिष्ठ नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल. यावर कोणाचाही ना नाही, असे ते म्हणाले. ठाणे येथे आपल्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, त्या ठिकाणी मोदींनी आपल्याला पाठिंबा दिल्यामुळे आपण अडीच वर्षात चांगले काम करू शकलो. मोठा निधी आणू शकलो, लाडक्या बहिणी भावांना मदत करू शकलो, याचा मला अभिमान आहे. त्यामुळे भविष्यात एकत्र येऊन काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा एकत्र येऊन काम करणार हे निश्चित आहे. मी कोणताही विषय ताणून ठेवला नाही. विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. त्यामुळे ते बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री करण्यासाठी जो निर्णय त्याला शिवसेनेच्या माध्यमातून आमचा पाठिंबा आहे, असे ते म्हणाले.