*कोंकण Express*
*संविधानिक मूल्यांची जपणूक करा – प्रा. डॉ. सतीश कामत*
*फोंडाघाट महाविद्यालयात संविधान दिन संपन्न*
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित, कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व आजीवन अध्ययन विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे सार्वत्रिक वाचन करून घेतले.
राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे लेफ्टनंट डॉ. राज ताडेराव म्हणाले की, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाच्या संविधान सभेने सध्याची राज्यघटना स्वीकारली. त्यामुळे या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी देशात सर्वत्र ‘संविधान दिन’ साजरा केला जातो. भारतातील विविध धर्म आणि जातींच्या लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे.आपल्या देशाचे सर्व कायदे या राज्यघटनेने बनवलेले आहेत.या संविधानांतर्गत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, संसद, राज्य विधिमंडळ, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यासह देशातील सर्व न्यायालये त्याअंतर्गत काम करतात. शिवाय, याच संविधानाने आपल्या अनेक हक्क दिले आहेत ज्यामुळे आपण संपूर्ण स्वातंत्र्य आणि समानतेने जीवन जगतो. देशातील नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा मूळ उद्देश आहे.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सतीश कामत म्हणाले की, २६ नोव्हेंबर संविधान दिन हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे. कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही. भारतातील विविध धर्म आणि जातींच्या १४० कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे. राज्यघटनेतच देशाची तत्त्वे आणि ती चालवण्याच्या पद्धती आहेत.
संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. राज्यघटनेने दिलेले मुलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपल्याला हक्क बहाल करत असले. तर, त्यात दिलेली मुलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात. २०१५ मध्ये भारत सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. २०१५ हे वर्ष यासाठी विशेष ठरले कारण त्या वर्षी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. तेव्हापासून, संविधानिक मूल्यांबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना वाढवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
या संविधान दिनी आपण आपली मूलभूत कर्तव्ये आणि देशाचे कायदे आयुष्यभर पाळण्याची शपथ घेतली पाहिजे. देशाचा एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनल्याने संविधानाचा उद्देश तर पूर्ण होईलच शिवाय, संविधान निर्मात्यांच्या स्वप्नातील राष्ट्रही घडेल. आज आपण अशा लोकांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली पाहिजे.
यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात निबंध व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी “हमारा संविधान – हमारा सन्मान” अशा घोषणा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष रायबोले यांनी केले तर आभार प्रा. विनोदसिंह पाटील यांनी मानले.

