*कोंकण Express*
*मालवणमध्ये उद्या (२७) सागरी तळ स्वच्छता मोहीम*
*वनशक्ती आणि नीलक्रांती संस्थांच्या वतीने सहभागाचे आवाहन*
*राज्यातली अशा प्रकारची पहिलीच मोहीम असल्याचा दावा*
*कुडाळ : प्रतिनिधी*
वनशक्ती संस्था आणि नीलक्रांती कृषी व पर्यटन संस्थेच्या वतीने उद्या २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते १० या वेळेत मालवण बंदरजेट्टी येथे सागरी तळावरील स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारची हि महाराष्ट्र राज्यातील पहिली समुद्र तळाची स्वच्छता मोहिम असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. या मोहिमेत पर्यटक, स्थानिक रहिवासी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन या दोन्ही संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
वनशक्ती ही स्वयंसेवी संस्था गेली १६ वर्षे पर्यावरण शिक्षण, संवर्धन, जनजागृती आणि संशोधन या क्षेत्रांत कार्यरत आहे. सागरी कचरा, विशेषतः जैवविघटनशील नसलेल्या कचऱ्याच्या धोकादायक संचयामुळे किनारपट्टी आणि सागरी परिसंस्था स्थानिक समुदायांच्या कल्याणाला धोका निर्माण झाला आहे , म्हणून वनशक्तीतर्फे महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय मत्स्य सर्वेक्षण, नीलक्रांती आणि इतर स्थानिक संघटनांच्या सहकार्याने दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७:३० वाजता मालवण बंदरजेट्टी येथे सागरी कचरा स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
या सागरी स्वच्छतेच्या उपक्रमामध्ये प्रशिक्षित आणि परवानाधारक स्थानिक स्कुबा डायव्हर्सच्या गटासह समुद्रतळामधील कचरा काढण्यासाठी आणि त्याचा पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी काम केले जाणार आहे. या स्वच्छता मोहिमेमध्ये सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद आणि नीलक्रांती कृषी व पर्यटन संस्थेचे अध्यक्ष रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी केले आहे.

