*कोंकण Express*
*वेंगुर्ले येथील बेपत्ता युवक पुण्यात सापडला*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
कुडाळ रेल्वेस्थानक येथून सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला रोहन अरुण कैरकर वय २४, रा. उभादांडा- वेंगुर्ले हा युवक पुणे येथे सापडला. कुडाळ पोलिसांनी त्याला पुणे येथे जाऊन ताब्यात घेतले. रविवारी त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
रोहन हा मनोरुग्ण असून त्याची आई अनिता केरकर या त्याला रत्नागिरी येथे उपचारासाठी घेऊन गेल्या होत्या. १९ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथून रेल्वेने कुडाळ रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याची आई अनिता यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. हवालदार मंगेश शिंगाडे तपास करीत होते. रोहनचा शोध सुरू असताना तो दापोडी पोलीस ठाणे (पिंपरी चिंचवड, पुणे पोलीस आयुक्तालय) हद्दीत रस्त्यावर फिरताना तेथील पोलिसांना सापडला. चौकशीअंती तो युवक कुडाळ येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तेथील पोलिसांनी कुडाळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार हवालदार मंगेश शिंगाडे, हवालदार सचिन गवस व हवालदार समीर बांदेकर आदींचे पथक दापोडी पोलीस ठाणे येथे गेले. पुणे पोलिसांकडून त्याला ताब्यात घेत कुडाळ येथे आणले.रविवारी त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले.
रत्नागिरी येथेउ उपचार करून रोहन आपल्या आईसोबत रेल्वेने कुडाळ स्थानकावर यायला निघाला. येथील रेल्वेस्थानकावर त्याची आई रेल्वेतून उतरली. मात्र, गर्दीत तो येथे उतरलाच नाही. तो त्याच रेल्वेने तसाच मडगाव-गोवा येथे पोहोचला. मडगाव रेल्वेस्थानकावरून तो पुणे येथे जाणाऱ्या एका रेल्वेत बसला व पुणे येथे पोहोचला. तेथे फिरताना पुणे पोलिसांना सापडला होता, असे कुडाळ पोलिसांनी सांगितले.