*कोकण Express*
*४ हजाराची लाच प्रकरणी कसालचे मंडल अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात!*
*सिंधुदुर्गनगरी*
कायदेशीर खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदी खताची सातबारा वर नोंद मंजूर करणे करिता तक्रारदार यांच्या कडुन रोख ४ हजार रूपयांची लाच स्विकारताना कसालचे मंडल अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
या प्रकरणी कुडाळ येथील सिंधुदुर्ग जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माहिती दिली की, ओरोस येथील एका भुधारकाने तक्रार दिली की, त्यांनी कायदेशीर खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदी खताची सातबारा वर नोंद मंजूर करणे करिता कसालचे मंडळ अधिकारी हांगे हे चार हजार रूपये मागतात.
सदरच्या या तक्रारीनुसार मंगळवारी 12:30 वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक दिपक कांबळे, पोलीस निरीक्षक श्री. केणी, पोहवा रेवंडकर,परब, कसाल मंडळ कार्यालय येथे सापळा रचला. व यावेळी तक्रारदार यांचेकडुन रोख 4 हजार रूपयांची लाच स्विकारताना हांगे यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडले.
लाच स्विकारल्या प्रकरणी हांगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन या प्रकरणाचा पंचनामा रात्री उशीरापर्यंत सुरू होता. या घटनेनंतर महसुल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तिने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.