*कोंकण Express*
*आपला आयात उमेदवार राजन तेली म्हणजे रेटून खोटे बोलण्याची ओपन युनिव्हर्सिटीच, तुम्ही कसले दीपकभाईंना पुरस्कार द्यायची भाषा करता?*
*उबाठाच्या जयेंद्र परुळेकर यांना शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांचे चोख प्रत्युत्तर*
उबाठा शिवसेनेचे आयात उमेदवार राजन तेली हे कालपर्यंत भाजपाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नरेंद्र मोदी, अमित शहा हे त्यांचे देव होते. त्यांची रोजची आरती उतरून राजन तेलीनी आपले बस्तान सावंतवाडीत मांडले आणि आता उद्धव ठाकरेंना देव्हाऱ्यात बसवून त्यांची महापूजा मांडली आहे. खोटेपणाची ओपन युनिव्हर्सिटी असणारे राजन तेली उद्या कुठे असतील हे खुद्द परुळेकरच काय, प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांनाही सांगता येणार नाही, तेव्हा जयेंद्र परुळेकरांनी उबाठा प्रवक्ते आहोत म्हणून राजन तेलींना जास्त खांद्यावर उचलून घेण्यात आपली शक्ती वाया घालवू नये. त्यातून आपल्या कानांची नाहक वाट लावून घेण्यापेक्षा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेतृत्वाने आता शांत बसावे आणि आपली सव्वा लाखाची मूठ झाकली राखणे हेच शहाणपणाचे ठरेल!
ज्यांच्याकडे दर पाच वर्षांनी रिन्यूअल होणारी, खोटे बोलण्याच्या आधुनिक अभ्यासक्रमाची युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी दीपक केसरकरांवर खोटारडेपणाची टीका करणे हास्यास्पद आहे. दीपक केसरकर यांच्या प्रचंड कामाने प्रभावित होऊन इथल्या जनतेनेचे जे पुरस्कार द्यायचे आहेत ते दीपक केसरकर यांना मागील पंधरा वर्षे सलग दिले आहेत, त्यापूर्वीही जनता आपल्या प्रेमाचे आणि विश्वासाची पुरस्कार केसरकरांना देत आली आहे.
दुसरीकडे वारंवार केसरकरांविरुद्ध उभे राहणाऱ्या परुळेकरांच्या आजच्या आयात नेत्याला म्हणजेच राजन तेलीना जनतेने वारंवार आणि सतत पराभूत करून त्यांच्या खोटारड्या कामाचे योग्य ते पुरस्कारही दिलेले आहेत. दीपक केसरकरांना जयेंद्र परुळेकर यांच्यासारख्या पावसात उगवणाऱ्या नेत्यांकडून कसल्याच पुरस्कारांची अपेक्षा नाही. त्याऐवजी त्यांनी निवडणुकीनंतर राजन तेलीना कोणता पुरस्कार द्यावा लागेल याचे चिंतन करावे, असा वज्रप्रहार शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी केला आहे.