उद्धवजी ठाकरे यांचा रस्ता राणेंनी रोखून दाखवावा- विनायक राऊ

उद्धवजी ठाकरे यांचा रस्ता राणेंनी रोखून दाखवावा- विनायक राऊ

*कोंकण Express*

*उद्धवजी ठाकरे यांचा रस्ता राणेंनी रोखून दाखवावा- विनायक राऊत*

*नारायण राणे हे राजकारणातले धृतराष्ट्र- आ. वैभव नाईक*

*जिल्हावासीयांनी राणेंच्या दोन्ही मुलांना पराभूत करून जिल्हा शांत आणि समृद्ध करावा- गौरीशंकर खोत*

*निलेश राणेंची अयशस्वी खासदार म्हणून ओळख- सतीश सावंत*

*कुडाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न*

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना नारायण राणेच काय तर मोदी सरकारही रोखू शकत नाही. त्यामुळे राणे यांनी धमक्या देऊ नयेत. उद्धवजी ठाकरे यांचा रस्ता रोखून दाखवावा असा इशारा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणे यांना दिला. तसेच धनुष्यबाण संपविणार असे सांगणाऱ्या राणे यांना तोच धनुष्यबाण घेऊन मुलासाठी भीक मागावी लागत आहे असाही टोला राऊत यांनी लगावला. आता आमदार वैभव नाईक हे याच कुडाळ मतदारसंघातून राणेंनंतर त्यांच्या मुलाचे राजकिय अस्तित्व संपविणार असा विश्वासही विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
कुडाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज संपन्न झाला. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतिश सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, सरचिटणीस प्रकाश जैतापकर, नगराध्यक्ष अक्षता खटावकर, अमरसेन सावंत, श्रेया परब,मंदार शिरसाट, राजन नाईक,बबन बोभाटे,अभय शिरसाट, संतोष शिरसाट व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विनायक राऊत म्हणाले, २००५ साली नारायण राणे यांची बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतून हकालपट्टी केली आता त्याच राणेंच्या पुत्राला शिंदे गटात घेतले. त्याचबरोबर जनतेच्या पैसा भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या सरकारकडून खाल्ला जात आहे. आता राणे मंत्री का नाहीत? असा सवाल राऊत यांनी उपस्थीत करीत दि. १४ डिसेंबर २०२२ रोजी एका उद्योजकाने पंतप्रधान कार्यालयात मेल केला की, राणे यांच्याकडे असलेल्या खात्याचा त्यांनी बट्ट्याबोळ केला. त्यांच्या सचिवानी १० टक्के कमिशन मागितले. हिम्मत असेल तर पाठवलेले पत्र खोटे आहे असे राणे यांनी सांगावे.
यावेळी वैभव नाईक म्हणाले, मतदारसंघात मी काम केले म्हणून नारायण राणेंना दारोदार फिरावे लागत आहे. कोरोना काळात राणे कुटुंबीय कुठे होते? केंद्रीय उद्योगमंत्री असताना राणे जिल्ह्यात एकही उद्योग आणू शकले नाहीत. राणे तुमचे आता वय झाले आहे, उगाच धमक्या देऊ नका, तिकिट मिळविण्यासाठी राणे दर निवडणुकीत पक्ष बदलतात त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होत असतो. नारायण राणे हे आता राजकारणातले धृतराष्ट्र झाले असून राजकारणात दोनही मुलांशिवाय त्यांना इतर कोणीच दिसत नाहीत. मतदार आता त्यांच्या डोळ्यावरची पट्टी २३ नोव्हेंबरला नक्की काढतील असा टोला नाईक यांनी राणे यांना लगावला.

गौरीशंकर खोत म्हणाले,विकासाच्या गोष्टीला खुंटित करण्याचे काम या सरकारने केले. हे भ्रष्टसरकार आहे.धमक्या देऊन राणे जिल्हय़ात दहशत निर्माण करत आहेत जिल्ह्यातील जनतेने त्यांच्या दोन्ही मुलांना पराभूत करून शांत आणि समृद्ध जिल्हा करावा.
यावेळी सतीश सावंत यांनी राणे यांच्या वर जोरदार टीका करताना सांगितले की, या निवडणूकीत राणे पॅटर्न जन्माला आला आहे. एक मुलगा भाजपात तर दुसरा शिवसेनेत एका गाडीवर दोन झेंडे लावण्याचे काम राणे यांना करावे लागत आहे. राणे यांचा पूर्वी व्यवसाय काय होता? यांच्या मुलांचा व्यवसाय काय? बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेने राणेंना सर्व काही दिले. आमच्यावर टीका करू नका, मी पण तोंड उघडू शकतो. केंद्रात मंत्री होता, हिंमत असेल तर राणे कुटुंबीयांनी माझ्यावर बोलावे? राणेंनी भाजपवर टीका केली ती सर्व भाजप वाले विसरले आहेत. जिल्ह्यात इकोसेन्सिटिव्ह झोन लागु झाला तेव्हा निलेश राणे खासदार होते तेव्हा ते काहीच करु शकले नाहीत.अयशस्वी खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. अशा अयशस्वी व्यक्तीला कुडाळ मालवण वासीयांनी मतदारसंघात थारा देऊ नये असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!