*कोंकण Express*
*अखेर कार्यकर्तेच पेटून उठले! अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांची समर्थनार्थ गर्दी!*
▪️”आजपासून तुम्हीच माझ्या स्टार प्रचारक!” – मायमाऊलीसमोर नतमस्तक होतांना विशाल परब गहिवरले*
*सावंतवाडी प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी बंडखोरी करत पक्ष अर्ज दाखल केला होता. काल अर्ज पाठी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते अर्ज मागे घेतील अशी अटकळ पक्षाच्या नेत्यांची होती. मात्र माझी उमेदवारी ही कोणत्याही स्वार्थासाठी किंवा अपेक्षेपायी नसून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मागील पंधरा वर्षे उपेक्षित ठेवल्या गेलेल्या जनतेसाठी आहे, कोणताही प्रकल्प न आणल्यामुळे त्रस्त बेरोजगारांसाठी आहे, प्रत्येक वेळी अन्याय होणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांसाठी आहे असे म्हणत त्यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी नकार दिला. माझी लढाई जनतेसाठी असून जनताच काय तो निर्णय घेईल असे त्यांनी पक्षनेतृत्वाला कळवले. निलंबनाच्या दबावतंत्राला न जुमानता अखेर विशाल परब हे निवडणुकीच्या रिंगणात ठाम आहेत, यावर काल शिक्कामोर्तब होताच आज अक्षरशः शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात धाव घेतली. श्री देव पाटेश्वर आणि देव उपरलकर यांना नारळ ठेवून नतमस्तक होण्याच्या कार्यक्रम ठरला होता, मात्र त्याचवेळी शेकडो कार्यकर्त्यांचा, मायमाऊली आणि युवावर्गाचा आशीर्वाद व साथ मिळाल्याने अपक्ष उमेदवार विशाल परब अक्षरश: गहिवरले. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी मायमाऊलींना नमस्कार करत “आज पासून तुम्हीच माझ्या स्टार प्रचारक” असे संबोधताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना समर्थन दर्शवले. यानंतर समर्थकांच्या गर्दीत श्री विशाल परब श्री देव पाटेश्वर व श्री देव उपरलकर यांच्या दर्शनासाठी रवाना झाले. विशाल परब यांना मिळणारे प्रचंड जनसमर्थन हा कोकणातल्या राजकीय चर्चेचा आणि विरोधकांच्या धसक्याचा विषय बनला आहे.