*कोकण Express*
*जिल्ह्यातील बिघडलेल्या राजकीय परिस्थितीला शिवसेनाच जबाबदार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा थेट आरोप*
*हिम्मत असेल तर सेनेच्या खासदार आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवा*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा त्यानंतर भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल यश यामुळे खा. विनायक राऊत अस्वस्थ झाले. त्यांनी नारायण राणेंवर केलेल्या टिकेवर माजी खासदार निलेश राणे यांनी जशास तशी प्रतिक्रिया दिली. मात्र, टिकेला टिकेने उत्तर देण्याऐवजी शिवसेनेने केलेल्या कृत्याची प्रतिक्रिया भाजपनं सावंतवाडी व कुडाळात दिली. त्यांनी हेतुपुरस्सर कृत्य केल्यानच भाजपनं त्यावर प्रतिक्रिया दिली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकीय द्वंद्वाला पूर्णपणे शिवसेनाच जबाबदार आहे असा थेट आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला. तसेच याचा जिल्हा पोलिस अधिक्षकांनी विचार करणं गरजेचं आहे. त्यांनी सखोल चौकशी करून आधी आ.वैभव नाईक यांच्यासह इतर शिवसैनिकांवर कधी गुन्हे दाखल करणार हे जाहीर करावं. प्रशासनान खबरदारी घेतली असती तर ह्या घटना घडल्या नसत्या. त्यामुळे भाजपला डिवचल्यास जशास तसं उत्तर दिल जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, मोदी लाटेत भाजपच्या मदतीने निवडून आलेले खासदार विनायक राऊत व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या जोरावर व भाजपच्या नेत्यांच्या प्रतिमा वापरून निवडून आलेले दोन्ही सेनेचे आमदार यांनी हिम्मत असेल तर राजीनामे द्यावेत व जिल्ह्यात कोणाची ताकद आहे व जनता कोणाच्या बाजूने आहे ते अजमवावे,
असे खुले आव्हानही राजन तेली यांनी दिले.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजन तेली यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, अतुल काळसेकर, नगरसेवक आनंद नेवगी, केतन आजगांवकर, . दिलीप भालेकर, बंटी पुरोहित, परिक्षित मांजरेकर, अमित परब आदी उपस्थित होते.