*कोकण Express*
*दाणोली-सावंतवाडीमार्गे गोवा रस्ता मजबुतीकरण करावा…*
*मंगेश तळवणेकर यांचे शिवराम दळवींना आवाहन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
दाणोली बावळाट-बांदा रस्ता मजबुतीकरण केल्यास सावंतवाडी पर्यटनावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. माजी आमदार शिवराम दळवींनी सावंतवाडीचा विचार आधी करून आपली मागणी बदलून दाणोली-सावंतवाडीमार्गे गोवा असा रस्ता मजबुतीकरण करावा, अशी मागणी वजा आवाहन माजी शिक्षण आरोग्य सभापती तथा श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी शिवराम दळवींना केले आहे. तळवणेकर म्हणाले, याआधीच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहर सोडून बाहेरून गेला आहे. पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकातून येणाऱ्या पर्यटकांना गोव्यात जाण्यासाठी दाणोली-बावळाट ते बांदा रस्ता मजबुतीकरण करण्यात यावा या संदर्भातची मागणी माजी आमदार शिवराम दळवी यांनी सा.बां. विभाग कार्यकारी अभियंता यांची भेट घेत केली. मात्र हा रस्ता अधिक मजबूत झाल्यास सावंतवाडीच्या पर्यटनावर याचा नक्कीच विपरीत परिणाम होईल, कारण कर्नाटक, प. महाराष्ट्रातून येणारे पर्यटक सावंतवाडी शहरातून न येता थेट गोव्याला जाऊ शकणार आहेत. मात्र पर्यटनाचा विचार करता हा मार्ग सावंतवाडीतुन गेल्यास सावंतवाडी तालुक्याच्या पर्यटनासह मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, देवगड, कणकवली येथील पर्यटनाला त्याचा नक्कीच फायदा होईल, त्यामुळे माजी आमदार शिवराम दळवींनी आपल्या मागणीचा पुनर्विचार करावा, अशी विनंतीही तळवणेकर यांनी केली आहे.