मुंबई, दि. ०९ : कंगना वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. ‘आज मी दिवसभर ऑफिसमध्ये होतो. मी काहीही पाहिलं नाहीये, मला आज काहीच माहिती नाहीये,’ असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं. पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर संजय राऊत माहिती नाही, एवढच म्हणाले. तसंच कंगनाला महापालिका क्वारंटाईन करणार का? असा प्रश्नही संजय राऊत यांना विचारला, तेव्हा याबाबत महापौर सांगतील, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. दरम्यान कंगना राणौत विषयावर बोलू नका, असे सक्त आदेश मातोश्रीवरुन पक्षनेते आणि नवनियुक्त प्रवक्त्यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. कंगनाच्या मुंबईतल्या कार्यालयाच्या काही भागाचं पाडकाम महापालिकेने केलं, याबाबत न बोलण्याचा पक्षादेश शिवसेनेने दिला आहे. मुंबई मनपाने ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप भाजपने केला. कंगना प्रकरणावर शिवसेनेने मात्र आता मौन बाळगलं आहे.