*कोकण Express*
*रोटरी क्लब व भोसले नॉलेज सिटी तर्फे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन*
रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि भोसले नॉलेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ फेब्रुवारी रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच कालांतराने शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनाशक्तीला वाव देण्याची संधी या प्रदर्शनाद्वारे उपलब्ध होणार आहे.रोटरी क्लब सावंतवाडी व भोसले नॉलेज सिटी यांच्यातर्फे संयुक्त पत्रकार परिषद डॉ. नवांगुळ हॉस्पिटलमध्ये घेण्यात आली. यावेळी या विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश व एकंदर रूपरेषा स्पष्ट करण्यात आली.
आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर व्हावे यासाठी नवनवीन प्रकारचे शोध संशोधकांकडून लावले जातात. संशोधनातूनच मानवजातीला प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होते. संशोधनाचे बीज शालेय जीवनातच रोवल्यास देशाला संशोधकांची एक उत्तम पिढी प्राप्त होऊ शकते. याच उद्देशाने विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि भोसले नॉलेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शन २०२१ चे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी रोटरी अध्यक्ष डॉक्टर राजेश नवांगुळ यांनी स्पष्ट केले.
इयता ५वी ते ८वी आणि इयत्ता ८वी ते १०वी अशा दोन गटांमध्ये हे प्रदर्शन घेण्यात येईल. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळा गुगल फॉर्मद्वारे किंवा व्हॉटस् अप द्वारे आपल्या संघाची नावनोंदणी करु शकतात.या प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना आपापल्या प्रतिकृती २३ फेब्रुवारी पर्यंत आपल्या शाळेतच तयार करून ठेवायच्या आहेत. कोव्हीड पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. २४ व २५ फेब्रुवारी रोजी तज्ञ परीक्षकांची टीम सहभागी शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष प्रयोगांची पाहणी करेल तसेच प्रतिकृतींचे चित्रीकरणही करेल.
परीक्षक समितीने निवडलेल्या दोन्ही गटातील पहिल्या तीन प्रतिकृतींना सावंतवाडी येथील समारंभात मान्यवरांच्या हस्ते रविवार २८ फेब्रुवारी रोजी रोख पारितोषिक, प्रमाणपत्रे व ट्रॉफी वितरीत करून गौरविण्यात येईल. तसेच सहभागी सर्व शाळांना सहभाग प्रमाणपत्र देखील देण्यात येईल. विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणाऱ्यांसाठी पर्यावरण संरक्षण, अपारंपरिक उर्जा, जल शुद्धीकरण व स्वच्छता, रोग प्रतिबंधक उपाययोजना (उदा.कोव्हीड विषाणू पासून संरक्षण योजना इ.), सेंद्रिय शेती व फायदे इत्यादी विषय दिले जातील.
विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना मिळण्यासाठी जास्तीत जास्त शाळांनी व विद्यार्थ्यांनी यामध्ये नावनोंदणी करावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी रो.दिलीप म्हापसेकर – 8550975242 व नितीन सांडये – 9823869128 या क्रमांकावर संपर्क साधावा.