*कोकण Express*
*जिल्ह्यात राऊत – राणे वाद शिगेला!*
*शिवसैनिकांनी निलेश राणेंच्या पुतळ्याला जोडे मारो केले आंदोलन…..*
*सिंधुदुर्गनगरी – ता. १२ :*
खास. विनायक राऊत व माजी खा. निलेश राणे यांच्यातील वाद अधिक पेटला आहे. गेले चार दिवस शाब्दिक वाद सुरु असतानाच शुक्रवारी ओरोस येथील खास. राऊत यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलाचा हार घालत जोडे मारो आंदोलन केले. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना नीलेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून खास. राऊत यांच्या जीवाला धोका असल्याचे निवेदन दिले.
शिवसेना खास. विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या सारख्या नॉन मॅट्रिकला केंद्रात मंत्री करण्याची वेळ भाजपवर आली आहे, अशी टिपण्णी केली होती. त्यामुळे संतापलेल्या माजी खासदार निलेश राणे यांनी ‘राऊत तुझे दिवस भरले आहेत. दिससील तिथे तुला मारणार’ अशी धमकी दिली होती. त्यानंतर सेना आ. वैभव नाईक यांनी शिवसैनिकच निलेश राणे यांना मारतील, असा इशारा दिला. यानंतर हा शाब्दिक वाद अधिकच रंगत गेला. आरोप-प्रत्यारोप रंगलेले असताना गुरुवारी जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी प्रेस घेत वेळ आणि ठिकाण सांगा, असा इशारा निलेश राणे यांना दिला होता. तर आज शिवसेना अधिकच आक्रमक झाली. ओरोस येथील विनायक राऊत संपर्क कार्यालयासमोर निलेश राणे यांच्या पुतळ्याला चप्पल हार घालत मारहाण केली. तसेच पोलिस अधीक्षक यांना निवेदन देत निलेश राणे यांच्या वक्तव्यामुळे सिंधूदुर्गची शांतता भंग झाली आहे. तसेच निलेश राणे यांचे कार्यकर्ते सोशल मिडियावर राऊत यांच्या विरोधात भाष्य करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे, असे नमूद केले आहे.
जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जान्हवी सावंत यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.