*कोंकण Express*
*सावंतवाडी मतदारसंघातील सर्व कामे पूर्ण….*
*जागेचा प्रश्न न सुटल्यास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची जागा बदलावी लागेल शिक्षण मंत्री दीपक केसरकर…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
चौकुळ, आंबोली, गेळे या गावचे प्रश्न कायमस्वरूपी सुटले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस आणि अजित दादा पवार यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. सावंतवाडी येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न सुटल्यात जमा आहे. त्यासाठी शासनाचे 47 कोटी रुपये मंजूर आहेत. राजघराण्याकडून जागे बाबत माझी चर्चा चालू आहे. चार दिवसात याविषयी निर्णय न झाल्यास नाईलाजाने आम्हाला जागा बदलण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज गुरुवारी झूम अॅप द्वारे पत्रकारांची बोलताना सांगितले.
वेळागार ताज हॉटेलला परवानगी मिळाली असून लवकरच भूमिपूजन करण्यात येईल. तेथील स्थानिक लोकांच्या नऊ एकर जमीनीचा प्रश्न बाकी आहे. त्यांना अतिरिक्त नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येईल. जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत कोणतेही बांधकाम त्या ठिकाणी सुरु होणार नाही असे केसरकर म्हणाले.
सावंतवाडी एसटी स्टँडचा प्रश्न बीओटी द्वारे सोडवण्यात आला असून त्याचे टेंडर काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. वेंगुर्ला येथे प्रवासी जेटीचे काम मंजूर करण्यात आले आहे. तर आडाळी एमआयडीसीमध्ये आंतरराष्ट्रीय फार्मा सिटिकल कंपनी लवकर येणार असून त्यामुळे बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आडाळी एमआयडीसीचे काम पूर्ण व्हायला अजून चार महिने लागतील. यापुढे माझ्या मतदारसंघात राहिलेली सर्व विकासकामे निवडणूक आचारसंहितेपूर्वी मी पूर्ण करून घेईन असे केसरकर म्हणाले.