पत्रकार भवनासाठी दीड कोटी रुपयांचा निधी देऊ

पत्रकार भवनासाठी दीड कोटी रुपयांचा निधी देऊ

*कोकण Express*

*पत्रकार भवनासाठी दीड कोटी रुपयांचा निधी देऊ…*

*हसन मुश्रीफ; सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांना आश्वासन…*

*मुंबई:*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी येथील सध्या बांधकाम सुरू असलेल्या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनासाठी शिल्लक राहिलेला दीड कोटी रुपयांचा निधी लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार दीपक भाई केसरकर यांनी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाची मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी भेट घडवून आणली. मुंबईत मंत्रालयात नामदार मुश्रीफ यांच्या दालनात यासंबंधीची बैठक झाली. यावेळी आमदार दीपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, उपाध्यक्ष रमेश जोगळे आणि कार्यकारणी सदस्य बाळ खडपकर, बबन गवस हे उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास खात्याचे सचिव व इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजू लक्ष्मी यांनी ग्रामविकास खात्याकडे निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाची प्रत आणि निधीच्या मागणीचे निवेदन श्री जेठे यांनी यावेळी ग्रामविकास मंत्र्यांकडे सादर केले.आमदार दिपक केसरकर यांनी हे पत्रकार भवनाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी जो दीड कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. तो लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी नामदार मुश्रीफ यांच्याकडे केली.
यावेळी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकार भवनाच्या कामाची स्थिती काय आहे हे श्री जेठे यांच्याकडून जाणून घेतले. पत्रकार भवनाचे बांधकाम व रंग काम पूर्ण झाले असून विद्युतीकरण आणि साऊंड सिस्टिमचे काम वर्कऑर्डर निघाली असून आता लवकरच सुरू होईल अशी माहिती श्री जेठे यांनी ग्रामविकास मंत्री यांना दिली. त्यानंतर ग्रामविकास मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे निधीसाठी आपण शिफारशीसह प्रस्ताव सादर करून करून व लवकरच निधी मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. आमदार दिपक केसरकर यांनीही लवकरच नामदार अजित पवार यांची भेट घेणार असून निधी वर्ग करण्याची कार्यवाही लवकरच होईल असे आश्वासनही शिष्टमंडळाला दिले.यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरन नाईक यांनी बाळशास्त्री यांच्या पुतळ्या बाबत कला संचानालयाची परवानगी कशी घेता येईल, याबाबत आपण प्रयत्न करू असे, आश्वासन जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री उदय सामंत यांचीही यांचीही भेट मंत्रालयात घेतली. जिल्ह्याधिकार्‍यांनी पाठविलेल्या निधी मागणीच्या प्रस्तावाची प्रत पालकमंत्र्यांकडे श्री जेठे यांनी सादर केली.पालकमंत्र्यांनी तात्काळ निधीच्या मागणीची शिफारस करणारे पत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना सादर केले आहे. त्यामुळे हा निधी लवकरच मिळेल असा विश्वास गणेश जेठे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!