*कोंकण Express*
*सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विशाल परब देणार 6 रुग्णवाहिका..*
*पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे निमित्त, 26 सप्टेंबर रोजी लोकार्पण विशाल परब यांची माहिती..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तब्बल ६ रुग्णवाहिका वाटप करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी चालक आणि पेट्रोलची सुविधा सुद्धा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे लोकार्पण खुद्द रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते २६ तारखेला करण्यात येणार आहे. यावेळी खासदार नारायण राणे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज येथे दिली. दरम्यान चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आजपासून १ ऑक्टोबर पर्यंत मतदार संघात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. नेमके काय कार्यक्रम असतील याबाबतची माहिती आदल्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू, असे ते म्हणाले.
श्री. परब यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते मनोज नाईक, अॅड. अनिल निरवडेकर, माजी
नगरसेवक सुधीर आडिवरेकर, राजू बेग, माजी सरपंच अक्रम खान, दिलीप भालेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. परब म्हणाले, या ठिकाणी पालकमंत्री चव्हाण यांनी सर्वसामान्यांचा विकास डोळ्यासमोर ठेवून कोकणाचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक महत्त्वाकांशी प्रकल्प जिल्ह्यात आणले आहेत. त्यात खारीचा वाटा म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावंतवाडी मतदारसंघात तब्बल ६ रुग्णवाहिका वाटप करण्याचा आमचा मानस आहे. २६ तारखेला पालकमंत्री रवींद्र चव्हाण व खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत या रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष
प्रभाकर सावंत हे देखील उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ते पुढे म्हणाले, यापूर्वी आपण अशाच प्रकारची रुग्णवाहिका सेवा काही वर्षापुर्वी दिली होती. त्याचा तब्बल १४०० ते १५०० लोकांनी लाभ घेतला. अनेकांना त्याचा फायदा झाला. रुग्णांच्या मदतीसाठी आम्ही पोहोचू शकलो. याचा आम्हाला आनंद आहे. त्यामुळे हाच पायंडा पुढे ठेवून सावंतवाडी मतदारसंघात सहा रुग्णवाहिका वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या दृष्टीने हे वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फक्त रुग्णवाहिका वाटप न करता त्या ठिकाणी आवश्यक असलेला चालक व पेट्रोलचा खर्च हा आपण उचलणार आहोत. त्यामुळे कोणतीही समस्या निर्माण होणार नाही तर दुसरीकडे कोणत्या गावाला या रुग्णवाहिका देणार हे कार्यक्रमाच्या
दिवशी जाहीर करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
यावेळी ते म्हणाले, चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विधानसभा मतदारसंघात अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यात फळवाटप, रक्तदान अशा कार्यक्रमासमवेत विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. येणाऱ्या काळात पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली जाईल.