*कोंकण Express*
*धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना*
*ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना या
योजनांचा लाभ मिळेल*
*सिंधुदुर्ग*
राज्यात अनेक वर्षापासून ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ परिवहन विभागांतर्गत स्थापन करण्याबाबत कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष कै.प्रकाशजी (नाना) पेणकर यांनी सतत वीस वर्षे रिक्षाचालक मालक यांना पेन्शन मिळावी म्हणून अथक प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना आज अखेर यश मिळाले. महाराष्ट्रातील ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी यांची नोंदणी, बॅज वितरण, निरीक्षण, तपासणी व कर भरणा परिवहन खात्यामार्फत करण्यात येतो. त्यामुळे ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालकांची अदयावत संपूर्ण माहिती (डेटा) परिवहन विभागाकडे उपलब्ध असते. त्यामुळे परिवहन विभागातंर्गत ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची वा शासनाच्या विचाराधीन होती. त्याप्रमाणे शासनाकडून महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडून केंद्र शासनामार्फत व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या १. जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, २.आरोग्य विषयक लाभ, ३. कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना (रु.५०,०००/-), ४. पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, ५. कामगार कौशल्य वृध्दी योजना अशा विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना देण्यात येणार आहेत.
हा शासन निर्णय मा. मंत्रिमंडळाच्या दि.१६ मार्च २०२४ रोजी संपन्न बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आला आहे, असे सिंधुदुर्गचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींना बैठक घेऊन माहिती दिली.
त्यावेळी उपस्थित कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक, सहसचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटनेचे सचिव सुधीर पराडकर, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कुडाळ तालुकाध्यक्ष रवी माने, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे मालवण तालुकाध्यक्ष संदीप सावंत, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष धर्मेंद्र सावंत, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे बांदा शहर अध्यक्ष राजेश बांदेकर, सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष नागेश ओरसकर, देवगड तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव, रवींद्र कांदळगावकर, सिद्धार्थ नाडणकर ,रविंद्र चिंदरकर, रविकांत चांदोसकर, सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन रिक्षा संघटनेचे सचिव सुनील पाताडे व अन्य रिक्षा चालक मालक उपस्थित होते.