*कोंकण Express*
*सांस्कृतिक युवा महोत्सवात फोंडाघाट महाविद्यालयाचे यशस्वी पदार्पण*
*’जापसाल’ एकांकिकेला मिळाले मुंबई विद्यापीठाचे उत्तेजनार्थ पारितोषिक*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटने मुंबई विद्यापीठ आयोजित 57 व्या सांस्कृतिक युवा महोत्सवातील मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी दिनांक 30 व 31 ऑगस्ट रोजी मुंबईत लाला लजपतराय महाविद्यालय येथे पार पडली. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीत प्रथमच धडक मारलेल्या फोंडाघाट महाविद्यालयाने जबरदस्त कलाविष्कार सादर करून उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
*जापसाल* ही एकांकिका फोंडाघाटचे सुपुत्र व नाट्यलेखक श्री. विठ्ठल सावंत लिखित असून श्री. शेखर गवस यांचे दिग्दर्शन लाभले आहे. गावरहाठी आणि लोककलावंत यांच्यातील संघर्ष यात रेखाटला असून चमकत्या जगातील फसवेगिरी आणि त्यातून होणारी खऱ्या प्रेमाची शोकांतिका चित्रित केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवड फेरीतील दहा स्पर्धकांत तिसरा क्रमांक पटकावलेली ही एकांकिका विद्यापीठ स्तरावर उत्तेजनार्थ ठरली. त्याचबरोबर एफ वाय बी कॉम मधील प्राजक्ता लाड या विद्यार्थिनीने साकारलेल्या सत्यभामा या भूमिकेला सुद्धा उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. प्राजक्ता लाड, दिव्या लाड, कोमल जोईल, विशाखा ढवण, आयुष सावंत, अमोल तेली, सत्यवान गावकर, संकल्प चव्हाण व युवराज राठोड यांनी सहभाग घेतला. संगीत साथ साहिल पारकर व भावेश लाड यांनी केली. तर प्रकाशयोजना शाम चव्हाण यांनी केली.
या यशात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. राजू पटेल, सेक्रेटरी श्री. चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार श्री. सचिन तायशेटे व सर्व संचालक तसेच महाविद्यालय विकास समितीचे श्री. रंजन चिके यांनी प्रचंड मेहनत घेतली. यशस्वी संघाबरोबर लेखक श्री. विठ्ठल सावंत,सौ. सरोज सावंत, दिग्दर्शक श्री.शेखर गवस व प्राध्यापक वर्ग. या यशाबद्दल पंचक्रोशीतून सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

