*कोंकण Express*
*गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून शिक्षकांना कामगिरीवर का काढले जाते ?*
*माजी आ. परशुराम उपरकर यांनी केली चौकशीची मागणी; कलमठ येथील शिक्षकांच्या त्या प्रकाराबाबत तातडीने चौकशी करण्यात यावी…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली, कलमठ शाळेतील पदवीधर शिक्षकांना त्यांच्या घराजवळच्या शाळेत कामगिरीवर काढण्यात आले. तर सांगवे येथील पूर्ण प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षकांना कलमठ शाळेत कामगिरी करण्यात आली. मुळात शासन आदेशानुसार कामगिरीवर काढता येत नसताना जिल्ह्यात शिक्षण विभाग कडून सुरू असलेले ही प्रक्रिया याबाबतची चौकशी व्हावी अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केली आहे.
कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. उपरकर म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलेली कलमठ पूर्ण प्राथमिक शाळा आहे. या शाळेमध्ये असलेले पदवीधर शिक्षक हे राष्ट्रपती पुरस्कार विजेते आहे. मात्र, अशा शिक्षकांना कामगिरीवर का काढण्यात आले? याबाबत कलमठ गावामध्ये उलटसुलट चर्चा आहे. नागरिकांनी याबाबत शिक्षण विभागालाही पत्र दिले आहे. त्यांच्या जागेवर सांगवे येथील एका पदवीधर शिक्षकाला कलमठ येथे कामगिरीवर काढण्यात आले, हा नेमका प्रकार जिल्ह्यात काय सुरू आहे? त्याबाबत संशयास्पद वातावरण आहे. मुळात बदलापूर येथील शाळेची घटना घडली. त्यामुळे शिक्षण खाते हादरले आहे. नागरिकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, अशा परिस्थितीत शाळेतील पदवीधर शिक्षकांची ही बदली प्रक्रिया संशयाच्या बहुरात सापडली आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये ही नाराजी आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण? या प्रकरणांमध्ये नेमकी काय सुरू आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे. कणकवली गटशिक्षण अधिकारी शिक्षकांना का कामगिरीवर काढतात ? हा ग्रामस्थांचा सवाल आहे. शिक्षण विभागाने शिक्षकांना कामगिरीवर काढू नये, असा शासन आदेश असताना अशा कामगिरीवर शिक्षकांना नेमण्याच्या बदल्या का काढल्या जातात, याची चौकशी होणे अपेक्षित आहे. शिक्षण विभागाने आणि पोलिसांनी ही कलमठ मधील या प्रकाराबाबत चौकशी करावी, अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली आहे.