शहरातील महामार्ग चौपदरीकरणातील कामे मार्गी लागत नाहीत तो पर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज वाहतूक सुरू करू देणार नाही ; संदेश पारकर

शहरातील महामार्ग चौपदरीकरणातील कामे मार्गी लागत नाहीत तो पर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज वाहतूक सुरू करू देणार नाही ; संदेश पारकर

*कोकण Express*

*शहरातील महामार्ग चौपदरीकरणातील कामे मार्गी लागत नाहीत तो पर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज वाहतूक सुरू करू देणार नाही ; संदेश पारकर*

*फ्लाय ओव्हर ब्रीज वरुन वाहतूक सुरू करणार नसल्याचे
अधीक्षक अभियंता नवले यांचे आश्वासन….!*

*काही काळ पारकर व शिवसैनिक झाले आक्रमक ….!*

​*कणकवली ः प्रतिनिधी*

शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज वरून वाहतूक सुरू करू देणार नाही असा इशारा देत शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी लोखंडी अँगल टाकून फ्लाय वरील एका बाजूचा दुपदरी रस्ता बंद केला. या नंतर महामार्ग ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक व महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता फोन उचलत नसल्याचा आरोप करत शिवसेना नेते संदेश पारकर यांनी अधीक्षक अभियंता नवले यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत फ्लाय ओव्हर ब्रिज वरील रस्ता अडवल्या बाबत त्यांना कल्पना दिली. तसेच अर्ध्यातासात जर संबंधित अधिकारी येथे आले नाही.तर महामार्ग बंद करू असा इशारा दिला. यावर नवले यांनी जोपर्यंत कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरण आंतर्गतची कामे मार्गी लागत नाहीत. तोपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रीज वरुन वाहतूक सुरू करणार नसल्याचे आश्वासन नवले यांनी दिल्याची माहिती पारकर यांनी दिली. गेल्या तीन वर्षात महामार्ग ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरनने जिल्हावासीयांना मानसिक त्रास दिला आहे. एकवेळ विकास नको मात्र ठेकेदार कंपनीचा मानसिक त्रास थांबवावा अशी जनतेची मागणी असल्याची पारकर यांनी सांगितले. कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणाची कामे जोपर्यंत मार्गी लागत नाहीत, आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित होत नाही, निकृष्ट गटारांची कामे सुस्थितीत होत नाहीत, याच बरोबर आर ओ डब्ल्यू लाईन मध्ये येणाऱ्या अर्धवट सोडलेल्या इमारतींचा प्रश्न निकाली निघत नाही.तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरित,कै. श्रीधर नाईक उद्यान असे एक अनेक प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिजवरून वाहतूक सुरू करू नये. अशी भूमिका पारकर यांनी मांडली. यावेळी पारकर यांनी महामार्ग ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक गौतम व कार्यकारी अभियंता सलीम शेख हे शहरवासीयांची दिशाभूल करून फसवणूक करत असल्याचा आरोप केला. गडनदी पुलाजवळ केलेल्या या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपतालुकाप्रमुख राजू राणे,नगरसेवक कन्हैया पारकर, अवधूत मालणकर,अँड. हर्षद गावडे, भास्कर राणे,सुनील पारकर, वैभव मालंडकर,रुपेश आमडोस्कर, विलास कोरगावकर, उपशहर प्रमुख प्रमोद​​ मसुरकर,जय शेट्ये,साई कोदे,पराग म्हापसेकर,राजू साटीलकर,वैभव महाडिक,आदी उपस्थित होते. तर आम्ही कणकवलीकरचे अशोक करंबळेकर, विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री, संजय मालंडकर, महेश कोदे, सादिक कुडाळकर यांनीदेखील आंदोलन स्थळी उपस्थित राहत संदेश पारकर यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. फ्लाय ओव्हर ब्रिज सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना ठेकेदार कंपनीने जिल्हा वासियांची सुरक्षा देखील सांभाळण्याची गरज असल्याची भूमिका आम्ही कणकवलीकर यांच्या वतीने करंबेळकर यांनी मांडली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे,पोलीस उपनिरीक्षक जगदीश बांगर,श्री.इंपाळ,पोलीस हवालदार मंगेश बावदने यांनी आंदोलनस्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!