तळेरे येथे पर्यावरण पूरक अनोखे रक्षाबंधन

तळेरे येथे पर्यावरण पूरक अनोखे रक्षाबंधन

*कोंकण Express*

*तळेरे येथे पर्यावरण पूरक अनोखे रक्षाबंधन*

*प्रज्ञांगण आणि श्रावणी कंप्युटर एज्युकेशनचा उपक्रम*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

आपले सामाजिक कर्तृत्व तत्परतेने आणि सातत्य ठेऊन निभावत असलेल्या समाजातील विविध क्षेत्रात कार्य करत असलेल्या व्यक्तींना कृतज्ञतेची आणि त्यातही पर्यावरण पूरक राखी बांधून हा सण वेगळ्या प्रकारे आजच्या पिढीसमोर ठेवत आहात. समाजातील हा त्यांचा आदर्श यानिमित्ताने इतरांसमोर यावा आणि इतरांना त्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी आयोजित करण्यात आलेला हा अनोखा उपक्रम कौतुकास पात्र असल्याचे प्रतिपादन मावळुंगे प्राथमिक शाळेचे शिक्षक विकास राठोड यांनी केले.

ते तळेरे येथील प्रज्ञांगण आणि श्रावणी कंप्युटर एज्युकेशन यांच्यावतीने आयोजित केलेल्या एक राखी सामाजिक बांधिलकीची अंतर्गत कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात विकास राठोड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तर दत्तात्रय मारकड आणि निकेत पावसकर यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांना इको फ्रेंडली राखी बांधून करण्यात आली. यावेळी पत्रकार तथा ज्येष्ठ क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, पत्रकार तथा संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर, प्रज्ञांगण च्या प्रमुख सौ. श्रावणी मदभावे, श्रावणी कंप्युटर एज्युकेशनचे संचालक सतीश मदभावे, प्राथमिक शिक्षिका सौ. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्रावणी कंप्युटर एज्युकेशन च्या मुलांनी बनविलेल्या इको फ्रेंडली राख्या उपस्थित मान्यवरांना बांधण्यात आल्या. या सर्व राख्या विविध तृण आणि कडधान्यापासून बनविलेल्या होत्या. त्यातील धान्य पडल्यानंतर ते रुजावे अशी त्यामागील संकल्पना असल्याचे श्रावणी मदभावे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना दत्तात्रय मारकड म्हणाले की, अलीकडे सर्वजण पर्यावरणापासून दूर चालले आहेत. त्यामुळे सर्वच असमतोल बनले आहे. अशावेळी रक्षा बंधनाच्या निमित्ताने आज मांडलेली वेगळी संकल्पना कौतुकास पात्र तर आहेच. शिवाय, या तरुण पिढीला पुन्हा निसर्ग आणि पर्यावरणाकडे वळविण्याचा एक उत्तम मार्ग असल्याचे सांगत आपला जिल्हा तंबाखुमुक्त करण्याचा चंग बांधलेल्या या मदभावे दाम्पत्याला आपण सर्वांनी साथ देऊन त्यांचे हे अभियान यशस्वी करुया, त्यांना अधिक बळ देऊया.

यावेळी सतीश मदभावे, निकेत पावसकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर श्रावणी मदभावे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्मितेश पाष्टे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!