*कोंकण Express*
*भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे संयमी नेतृत्व, त्यांनी तूर्तास आपला संयम सांभाळावा*
*शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी करुन दिली महायुतीच्या धर्माची जाणीव*
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार कार्यरत असून गेल्या अडीच वर्षात क्रांतिकारी निर्णय घेणारे सरकार म्हणून ते कार्यरत आहे. या सरकारची आपणा सर्वांनाच किती गरज आहे हे त्यापूर्वीच्या अडीज वर्षात आपण सर्वानी अनुभवले आहे.
गेली कित्येक वर्ष मुंबई गोवा हायवचा प्रश्न प्रलंबित असून जनता त्यावरून संतप्त आहे. अशावेळी जनतेचे प्रश्न मांडत सन्माननीय शिवसेना नेते रामदास भाई कदम यांनी जनतेची व्यथा आणि खंत व्यक्त केली. सदर हायवेवे काम हे गणेश चतुर्थी पूर्वी एक साईडने तरी पूर्ण करु असे वचन मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी दिले होते. परंतु भौगोलिक परिस्थिती म्हणा किंवा तांत्रिक बाबीमुळे मार्ग पूर्ण होऊ शकलेला नाही.आपल्या आक्रमक स्वभावाप्रमाणे रामदास कदम यांनी जनतेची दुःखे व्यक्त केली, त्यावर क्रियेला प्रतिक्रिया म्हणून सन्माननीय रवींद्र चव्हाणदेखील आपल्या शैलीमध्ये उतरले आहेत. दोन्ही वरिष्ठ नेते आपापल्या पक्षातील महत्त्वाचे नेते असून महायुतीत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे, असे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी म्हणाले आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवर याची चर्चा करून भविष्यात असे पुन्हा होऊ नये म्हणून प्रयत्न होतीलच.
मात्र या विषयावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकर सावंत यांनी दखल घेत माफीनाम्याची भाषा करणे संयुक्तिक वाटत नाही. प्रभाकर सावंत आमचे सहकारी असून संयमी नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात भाजपा नेते राजन तेली महायुतीचा धर्म तोडून शिवसेना नेते दीपक केसरकर यांच्यावर वारंवार टीका करत असूनही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आपला संयम कधीही ढळू दिलेला नाही. आताही त्याच संयमाने हा विषय न ताणता महायुती म्हणून तो थांबणे महत्त्वाचे आहे. कारण अशी वक्तव्ये म्हणजे विरोधकांना युती तोडण्याची संधी देणे होईल, तसे झाल्यास महायुतीला नक्कीच नुकसान सोसावे लागणार आहे. आम्हाला शिवसेना म्हणून आमच्या ताकदीची पूर्ण खात्री आहे, पण यात नुकसान दोघांचेही आहे. स्थानिक नेते म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्यांचा कार्यकर्त्यांचा आम्ही शिवसैनिक म्हणून नेहमीच मानसन्मान ठेवला आणि ठेवत आहोत. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या क्रांतिकारक उठावामुळेच महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार बाजूला करून महायुतीची सत्ता आणण्यात यश आलेलं आहे. सदरचे यश आगामी विधानसभेमध्ये सुद्धा आपणाला महायुतीची सत्ता आणून हे यश टिकवणे महत्त्वाचे आहे लोकसभेच्या निवडणुकीत निकाल पाहता विधानसभेला महायुती एकत्रित असणं फार आवश्यक आहे.अन्यथा विरोधकांना संधी दिल्यासारखं होईल. सावंतसाहेबांना माझी विनंती राहील आपण आपला नेहमीचा संयम अबाधित राखावा. महायुतीसाठी आपले एवढे योगदान पुरेसे होईल, असा सल्लाही रत्नाकर जोशी यांनी प्रभाकर सावंत यांना दिला आहे.