*कोंकण Express
*वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसान भरपाईत शेतकरी उपाशी आणि भाजप कार्यकर्ते मात्र तुपाशी*
*कुडाळ तालुक्यासाठी मंजूर झालेल्या साडेआठ लाखापैकी एकट्या भाजपच्या बाळकृष्ण उर्फ दादा बेळणेकर यांना देण्यात आली तब्बल ३ लाखाची नुकसान भरपाई*
*शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांनी पुराव्यानिशी केली पोलखोल*
कुडाळ तालुक्यात सन २०२२-२३ साठी वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसान भरपाई पोटी शासनाने साडेआठ लाख रु. निधी मंजूर केला होता. त्यातील तब्बल ३ लाख रुपयाची नुकसान भरपाई वाडोस येथील भाजप पक्षाच्या बाळकृष्ण उर्फ दादा बेळणेकर व त्यांच्या पत्नीच्या नावे देण्यात आली आहे. मात्र इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम देण्यात आली आहे. हा मोठा भ्रष्टाचार असून शेतकरी उपाशी आणि भाजप कार्यकर्ते मात्र तुपाशी असाच प्रकार आहे. भाजप पक्षाच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग करून दादा बेळणेकर यांनी शासनाचा निधी लाटला आहे. सामान्य शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी वन विभागाचे अधिकारी अनेक कागदपत्रे मागतात,अनेक निकष लावतात. मात्र दादा बेळणेकर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून तीन लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांनी पुराव्यानिशी हा भ्रष्टाचार उघड केला आहे. याची चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास शिवसेना पक्षाच्या माध्यमातून वनविभागाच्या मुख्य कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृष्णा धुरी यांनी दिला आहे.