*कोकण Express*
*नागरिकांना केंद्रबिंदू ठेऊन शासकीय योजना राबवण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश*
नागरिकांना केंद्रबिंदू ठेऊन शासकीय योजना राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते काल औरंगाबाद येथे जिल्ह्यातल्या विकास कामांच्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यातल्या विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिल्या. या बैठकीला राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोविड प्रतिबंध तसेच लसीकरण, कृषीपंप जोडणी, अटल आनंद घन वनयोजना, तसंच पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतला. औरंगाबाद प्रमाणे राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजनेची जनजागृती करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजने अंतर्गत गुरुत्व वाहिनी तसंच जलकुंभ बांधकामाची पाहणी केली. पाणी पुरवठा योजनांची कालबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देश यंत्रणांना यापूर्वीच दिले असून, निर्देशित कामांची प्रगती पाहण्यासाठी आपण वारंवार औरंगाबाद येथे येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल बुलडाणा जिल्ह्यात लोणार सरोवराची पाहणी केली. लोणार सरोवराच्या विकासाचा आराखडा तयार करून, त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तर हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपाला येईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. ‘मातृतीर्थ सिंदखेडराजा’ चा ही विकास करण्यात येईल, तिथेही आपण लवकरच भेट देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.