*कोंकण Express*
*ओरस जैतापकर कॉलनी या ठिकाणी ओव्हर ब्रीजवरील अपघातास कारणीभूत ठरणारा बस थांबा सर्व्हीस रोडवरती सुरू करण्यात यावा*
*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांची मागणी*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
मुंबई-गोवा महामार्गावरील ओरस उड्डाण पुलावरील जैतापकर कॉलनी या ठिकाणी सुरू असणारा एसटी बस थांबा हा अपघातास कारणीभूत ठरणारा बनला आहे. त्यामुळे तो उड्डाण पुलावरील बस थांबा तातडीने हलवून सर्व्हिस रस्त्यावरती सुरू करण्यात यावा अशाप्रकारची आग्रही मागणी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी केली आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील ओरस जैतापकर कॉलनी येथील उड्डाण पुलावरती सुरू करण्यात आलेला एसटी बस थांबा प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. त्याठिकाणी बस थांबण्यासाठी बस वे नाही. राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणावरती सतत येजा सुरू असते. उड्डाण पुलावरुन तर येणारी जाणारी वाहने अतिशय भरधाव वेगाने येत असतात. या उड्डाण पुलावरती सध्या सुरू असलेला बस थांबा अपघातास कारणीभूत ठरणारा बनला आहे. उड्डाण पुलावरील दोन्ही बाजूला बस वे नसल्यामुळे रस्त्यावरतीच अचानक बस थांबल्यास मागून येणारे वाहन हे थांबलेल्या बसवरती मागून येऊन आदळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. त्याचबरोबर बसमधून उतरणाऱ्या प्रवाशांना मागून येणाऱ्या वाहणाची धडक बसून अपघात होण्याचा संभव आहे. तसेच या बस थांब्यावर शाळा, कॉलेजचे विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक प्रवासी मोठ्या प्रमाणात हायवेवरतीच बसची वाट पाहत उभे असतात.
यामुळे भर पावसात व उन्हाळ्यात उन्हातान्हात शालेय विद्यार्थी तसेच अन्य प्रवाशी व जेष्ठ नागरिकांना उघड्यावरती गाड्यांची वाट पाहत उभे रहावे लागते. तरी एसटी प्रशासन, महामार्ग पोलीस, आर.टी.ओ. प्रशासनाने यासंदर्भात गंभीर दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच उड्डाण पुलावरील अपघातास कारणीभूत ठरणारा एसटी बस थांबा ताबडतोब बंद करून तो सर्व्हीस रोडवरती बस वे करून हा बस थांबा सुरू करण्यात यावा तसेच प्रवाशांसाठी पिक अप शेड उभारण्यात यावी अशी मागणी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी केली आहे.