*कोकण Express*
*पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे उद्या जिल्ह्यात आंदोलन*
*शिवसेना नेते संदेश पारकर यांची माहिती*
*आमचे आंदोलन जनतेसाठी, भाजपासारखे दिखाऊ नाही; पारकर यांचा भाजपाला टोला*
*कणकवली ः प्रतिनिधी*
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यात तालुकानिहाय निषेध मोर्चा ५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. ५ फेब्रुवारी रोजी कणकवली शहरात पटकी देवी मंदिर ते प्रांताधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असून, यात शेकडो शिवसैनिक सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या विरोधातही या मोर्चात कृषी कायदे रद्द करा अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली. पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असून केंद्र सरकारचे यावर नियंत्रण नाही. यामुळे जनतेमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात उद्रेक निर्माण झाला आहे. शिवसेना नेत्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात ठिकठिकाणी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रात भाजपाचे पाशवी बहुमत असले तरी जनतेची पिळवणूक सरकार करत आहे. सिंधुदुर्गातील जनतेने या अन्यायकारक दरवाढीच्या विरोधात मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन पारकर यांनी केले आहे. सुमारे एक हजार लोक कणकवलीतील मोर्चात सहभागी होतील असा अंदाज पारकर यांनी वर्तवला आहे. आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, संदेश पटेल, आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेला पेट्रोल डिझेल दरवाढीचा सामना करावा लागत आहे. पूर्ण देशात या दरवाढीची तीव्रता जाणवत आहे. जनतेला होणाऱ्या त्रासाची तीव्रता दाखवण्यासाठीच आमचे आंदोलन आहे. कोरोनाच्या काळात बॅरेलचे दर कमी झालेले असताना पेट्रोल डिझेल दर कमी का झाले नाहीत असा सवालही पारकर यांनी केला. दरम्यान भाजपाकडूनही जिल्ह्यात वीज दरवाढ व वीज कनेक्शन कट करण्याच्या निर्णयाच्या विरोधात उद्या आंदोलन छेडले जात असल्यामुळे पारकर यांनी लक्ष वेधले असता, ज्या राज्यात भाजपप्रणीत सरकार आहे तेथेही वीज बील दरवाढ झाली. तेथे भाजपा आंदोलन का करत नाही. भाजपाला जर आंदोलनाची खाज असेल तर तेथे जाऊन आंदोलन करावे असा टोला पारकर यांनी लगावला. आमचे पेट्रोल-डिझेल दरवाढीचे आंदोलन हे भाजपासारखे दिखाऊ आंदोलन नाही. तर जनतेसाठीचे आंदोलन असल्याची टीका पारकर यांनी केली. चार महिन्यांपूर्वीच पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आम्ही आंदोलन पुकारले होते. मात्र कोरोनामुळे आंदोलन रद्द करावे लागले. कोरोना संपल्यानंतर तरी केंद्रातील भाजपा सरकार सुधारेल अशी आशा होती. मात्र पेट्रोल-डिझेलची दरवाढ दिवसेंदिवस वाढतच जात असल्याने अखेर आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे पारकर यांनी सांगितले. येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेत पारकर बोलत होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, संदेश पटेल, युवा सेना समन्वयक राजू राठोड, गोट्या कोळसुलकर, ऍड. हर्षद गावडे, भास्कर राणे, संजय पारकर आदी उपस्थित होते.