*कोंकण Express*
*जानवली येथे गुरुपौर्णिमा आदर्शवत संपन्न*
*श्री लिंगेश्वर पावणादेवी भजन मंडळाचे आयोजन*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ जानवली (गणपतीची वाडी) यांनी जानवली येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आदर्शवत संपन्न केला.
कणकवली तालुक्यातील जानवली येथील भजनी बुवा रविकांत राणे यांनी, त्यांच्या स्नेही जणांनी तसेच श्री लिंगेश्वर पावणादेवी भजन मंडळ, जानवली (गणपतीची वाडी) यांनी गुरुपौर्णिमेचा विशेष कार्यक्रम विविध क्षेत्रातील कलाकारांचा सन्मान करून आदर्शवत पार पाडला.
यावेळी प्रमुख अतिथी संगीत अलंकार बुवा अजित गोसावी, अष्टपैलू कलाकार, ज्योतिषी, वास्तुतज्ज्ञ तसेच आध्यात्मिक प्रबोधनकार ज्योतिष्याचार्य उदय दुदवडकर तसेच पखवाज विशारद महेश परब या त्रीमूर्तींचा जाणवलीतील सुप्रसिद्ध भजनीबुवा रविकांत राणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व श्रद्धापुष्प देऊन आदरपूर्वक गौरव करण्यात आला. त्याचबरोबर अनेक भजनी कलाकार, दशावतारी नाट्यकलाकार व आध्यात्मिक प्रबोधनकार यांचा पूजनीय गौरव यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचा शुभारंभ प्रमुख अतिथी अजित गोसावी, उदय दुदवडकर व व्यासपीठावरील अन्य मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यानंतर भजनी बुवा रविकांत राणे यांनी सद्गुरु वैकुंठवासी परशुराम सावंत महाराज व सद्गुरु वैकुंठवासी कोकण कला भूषण चंद्रकांत बुवा कदम (गुरुदास) यांच्या प्रतिमेचे श्रद्धापूर्वक पूजन केले.
याप्रसंगी गौरवाला उत्तर देताना ज्योतिष्याचार्य उदय दुदवडकर यांनी सदर कार्यक्रम हा आदर्शवत कार्यक्रम असल्याचे सांगितले. थर्टी फर्स्ट आणि कोजागिरीचे कार्यक्रम अनेक ठिकाणी साजरे होताना दिसतात मात्र ज्यांच्याकडून आपण काही शिकून मोठे होतो त्या मार्गदर्शकांप्रति कृतज्ञता अर्पण करण्याचा गुरुपौर्णिमेला करावयाचा शिष्टाचार कार्यक्रम मात्र क्वचितच ठिकाणी घडत असतो. ही परिस्थिती बदलून अशा प्रकारचा कार्यक्रम सर्वत्र मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. ज्ञानी कलाकारांनी अध्यात्मज्ञानाचा प्रसार करणे कलीकाळात मोक्ष साधण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे असेही उदय दुदवडकर यांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी ‘ गुरु थोर की देव थोर ‘ या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी काळ हाच परमेश्वर म्हणजेच देव असल्याचे प्रतिपादन केले आणि काळच सर्वांना बरेच काही शिकवीत असतो म्हणून काळ हा गुरुही असल्याचे त्यांनी प्रबोधित केले. काळ हाच परमेश्वर आणि काळ हाच गुरु असल्यामुळे गुरु आणि देव यांमध्यें भिन्नताच नसल्याने कोण थोर हा प्रश्नच उद्भवत नाही असे ज्योतिष्याचार्य उदय दुदवडकर म्हणाले. कार्यक्रमाचे निवेदक गोपी लाड यांनी प्रस्तावनेत म्हटले की, गुरुपौर्णिमेला अनेक गुरुजन आपली पूजा करून घेतात परंतु आजच्या कार्यक्रमात बुवा रविकांत राणे हे अनेकांचे मार्गदर्शक गुरु असूनही त्यांनी स्वतःचे पूजन करवून न घेता आपले गुरु आणि इतर कलाकार यांना गुरुतुल्य मानून त्यांचा सद्भाव भक्ती पूर्वक पूजनात्मक सत्कार केला हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य आहे.
याप्रसंगी सर्व उपस्थितांच्या वतीने तसेच बुवा रविकांत राणे यांचे हितचिंतक आणि शिष्यगण यांच्यावतीने बुवा रविकांत राणे यांचा आदरपूर्वक गौरव करण्यात आला. याप्रसंगी नटसम्राट बाळा सावंत, दशावतारी कलाकार डी. डी. सावंत, लवू पुजारी, खलनायकाची भूमिका करणारे सुप्रसिद्ध अभिनेते पप्पू साटम, दशावतारी कलाकार भास्कर सामंत, राजू हरियाण, विजय वाडकर, सुरेश गुरव, जाणवली सरपंच अजित पवार, पोलीस पाटील मोहन सावंत, सुप्रसिद्ध भजनी बुवा भास्कर गावडे, प्रसिद्ध पखवाज वादक मारुती मेस्त्री, बबन वाघ, शशी सावंत, विलास राणे, सदानंद कसालकर, भास्कर गावडे, आप्पा दळवी, बाळा सावंत इत्यादी नामवंत मंडळी कार्यक्रमास उपस्थित होती. स्नेहभोजन, भजन व गायन यांच्या परवणीने एकंदरीत हा कार्यक्रम सुसंपन्न झाला.