तळेरे येथील ज्येष्ठ नागरिकांची दिवंगत विनय पावसकर यांना श्रद्धांजली

तळेरे येथील ज्येष्ठ नागरिकांची दिवंगत विनय पावसकर यांना श्रद्धांजली

*कोंकण Express*

*तळेरे येथील ज्येष्ठ नागरिकांची दिवंगत विनय पावसकर यांना श्रद्धांजली*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

तळेरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच सुनील तळेकर ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विद्यमान सचिव, सामाजिक कार्यकर्ते विनय पावसकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृत्यर्थ तळेरे येथे सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या तळेरे शाखेच्यावतीने तळेरे येथील कै. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यालयात शोकसभा आयोजित करून विनय पावसकर यांना हृद्य श्रद्धांजली वाहण्यात आली.

समाजात काही व्यक्ती त्यांच्या उदात्त कार्यामुळे समाजप्रिय होऊन जातात. असेच कार्यसंपन्न व्यक्तिमत्व विनय पावसकर यांना एक शोक सभा आयोजित करून येथील ज्येष्ठ नागरिकांनी श्रद्धांजली अर्पित केली. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ (भाई) बांदिवडेकर यांनी विनय पावसकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्याप्रति श्रद्धादीप प्रज्वलित केला. ज्येष्ठ नागरिक प्रभाकर ताम्हणकर यांनी शोकसभेचे प्रास्ताविक केले. यानंतर सर्व उपस्थितांनी स्तब्ध राहून दिवंगत विनायक पावसकर यांना हृद्य श्रद्धांजली वाहिली.

याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक उदय दुदवडकर, चंद्रकांत (बाळा) तळेकर, जयप्रकाश कल्याणकर, वामन ताम्हणकर यांनी केलेल्या वक्तव्यात या सर्वांनी सांगितले की, विनय पावसकर हे एक नावाप्रमाणेच विनयशील व्यक्तिमत्व होते. तळेरे येथील ग्रामपंचायतीची सरपंच पदावरून त्यांनी उत्तम प्रकारे धुरा सांभाळली होती. त्यांच्यात दानशूरता व सहकारी वृत्ती होती. तळेरे येथील सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान होते. तळेरे येथील तळेकर ट्रस्ट व सार्वजनिक वाचनालय या संस्थांची त्यांनी माजी अध्यक्ष व विद्यमान सचिव म्हणून उत्तम धुरा सांभाळली होती. सर्व वक्त्यांनी त्यांच्या जाण्याने एक सृजनशील सामाजिक कार्यकर्ता हरपल्याचे दुःख अभिव्यक्त केले.

सदर शोकसभेला श्रीधर सुर्वे, भास्कर सोहोनी, अरुण भांबुरे, दिलीप मुद्राळे, श्रीमती अनिता तळेकर, मोहन खानविलकर, रमेश वरूणकर, विश्वास पावसकर, सुरेश तळेकर, विजय सामंत, रवींद्र पाताडे, गजानन राणे, श्रीमती राधाबाई गुरव इत्यादी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या तळेरे शाखेचे सचिव दिलीप पाटील यांनी दिवंगत विनायक पावसकर यांना सद्गती प्राप्त होण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करून सदर शोकसभेची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!