*कोंकण Express*
*कणकवलीच्या अक्सा शिरगावकर सिंधूकन्येने राज्यस्तरीय तिरंदाजी मध्ये सुवर्णपदक पटकावले*
*अक्सा मुद्दसर शिरगावकरने सुवर्णपदक पटकावून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला*
*सिंधूकन्येची राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेसाठी झाली निवड*
*कणकवली ः प्रतिनिधी*
अमरावती येथे सुरु असलेल्या, महाराष्ट्र अर्चरी इसोसिएशन यांच्यातर्फे होत असलेल्या राज्यस्तरीय अर्चरी (तिरंदाजी) स्पर्धेत कणकवली येथील अक्सा मुद्दसर शिरगांवकर या १२ वर्षीय मुलीने १३ वर्षाखालील वयोगटामध्ये सुवर्णपदक पटकावून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विशेष म्हणजे अक्सा ही पहिल्यांदाच राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाली होती.
या यशामुळे अक्सा हिची राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अक्सा ही येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कुलची विद्यार्थिनी आहे. तिच्यातील तिरंदाजी खेळामधील कौशल्य पाहून पालकांनी तिला सातारा येथील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक प्रविण सावंत यांच्या अकॅडमीत पाठवले. गेल्या आठ महिन्यापासून ती सातारा येथेच राहून तिरंदाजीचे प्रशिक्षण घेत आहे.
दरम्यान अमरावती येथे सध्या महाराष्ट्र अर्चरी इसोसिएशन यांच्यातर्फे विविध वयोगटांमध्ये तिरंदाजी स्पर्धा सुरु आहेत. स्पर्धेसाठी १३ वर्षांखालील वयोगटामध्ये २०२ स्पर्धक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या वयोगटामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अक्सा ही एकमेव स्पर्धक होती. या वयोगटात २० जणांमध्ये मुख्य स्पर्धा रंगली. अखेरीस अक्सा हिने महत्वपूर्ण लक्ष्यभेद करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. दरम्यान याच स्पर्धेमध्ये ती १५ वर्षांखालील वयोगटामध्येही सहभागी झाली आहे. अक्सा ही येथील प्रतिथयश शासकीय ठेकेदार मुदस्सर शिरगांवकर व खुशबू स्वयंसहाय्यता बचतगटाच्या माध्यमातून प्रभावी कामगिरी करणाऱ्या, राज्यस्तरीय पारितोषीक प्राप्त करणाऱ्या सौ. तन्वीर शिरगांवकर यांची मुलगी आहे. या यशाबद्दल अक्सा हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.