*कोंकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात योग दिन संपन्न*
*निरोगी जीवनाचा मंत्र म्हणजे योग*
*प्रा. डॉ. मारोती चव्हाण*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये जागतिक योग दिन संपन्न झाला. त्या प्रसंगी प्रशिक्षक कणकवली महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. मारोती चव्हाण उपस्थित होते. महाविद्यालयाचा राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून या दिनाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी बोलताना डॉ. मारोती चव्हाण म्हणाले की, योग हा जगातील सर्वच माणसांचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करतो. योगा सारखा साधा, सोपा आणि स्वस्त उपाय जगात नाही. दिवसभरातील थोडावेळ योगासाठी दिला तर मन आणि शरीर तंदुरुस्त होते. योग सकाळी करावा जेणेकरून दिवसभराची ऊर्जा मिळते व सायंकाळी करावा कारण दिवसभराचा मनाचा कचरा निचरा होऊन जातो. धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. झोप घेताना योगात घ्या आणि उठताना योगात उठा. ध्यानधारणेत मन तंदुरुस्त होत असते. जिथे ऍलोपॅथीने हात टेकले ते असाध्य रोग योगाने बरे केले आहेत. त्यामुळे योग्य मंत्र जगणे हे निरोगी जगणे आहे. आता तर सर्व जगाने योग स्वीकारला आहे. त्यामुळे आपणही योग करून सुखी व निरोगी जीवन जगू या. असे आवाहन केले.
त्याचबरोबर त्यांनी योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्ट. डॉ. राज ताडेराव यांनी केले. ते म्हणाले की, योग हा पुरातन काळापासून चालत आलेला आहे. जगातल्या महान व्यक्तींनी योगाची साधना केली आणि आपली प्रगती साधली आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच योग साधना केली तर रोगमुक्त जीवन जगता येईल केलेल्या अभ्यासात प्रगती करता येईल.
आपल्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष रायबोले म्हणाले की, योग हा माणसाला निरोगी ठेवण्याचा पासवर्ड आहे. जो मनुष्य सकाळी दोन वेळेस आंघोळ करतो. त्याला कधीही दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही. पहिली अंघोळ वर्कआउटने होणे गरजेचे आहे आणि दुसरी आपल्या स्वास्थ्यासाठी तन, मन दोघांची निगा ही प्राणायाम,योगा कसरती राखतात असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे आभार डॉ. बालाजी सुरवसे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.